“समुद्र आमच्या हक्काचा… नाही कुणाच्या बापाचा” ; मालवण पाठोपाठ रत्नागिरी दणाणली !
पर्ससीन मच्छिमारांचे रत्नागिरीत आंदोलन ; राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा पाठींबा
शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट घेऊन न्याय मागणार : राष्ट्रवादीचे नेते बशीरभाई मूर्तझा यांची ग्वाही
कुणाल मांजरेकर
राज्य सरकारने मासेमारी कायद्यात सुधारणा करून १ जानेवारी पासून पर्ससीन मासेमारीवर बंदी आणली आहे. या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहाय्यक मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर पर्ससीन मच्छिमारांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. मालवण पाठोपाठ रत्नागिरीतही पर्ससीन मच्छिमारांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. “समुद्र आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा”, अशा गगनभेदी घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या. दरम्यान, रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजपर्यंत अनेक वेळा आमचे प्रश्न सोडवले आहेत. यानंतरच्या काळातही शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पर्ससीन मच्छीमारांना न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बशीरभाई मूर्तझा यांनी दिली.
१ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीतच पर्ससीन नेट मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत पर्ससीन मासेमारीवर बंदी घालून शासनाने मच्छीमारी व्यवसाय उद्ध्वस्त केल्याचा आरोप करीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्ससीन मच्छिमारांनी मालवण येथील सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालया समोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. मालवण पाठोपाठ रत्नागिरी मध्येही पर्ससीन नेट मच्छिमारांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. शेकडो मच्छीमार या आंदोलनात सहभागी झाले असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका स्थानिक मच्छीमारांनी घेतली आहे.
पर्ससीन नेट मच्छिमारांनी शासनासमोर ६ मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये सप्टेंबर ते मे अखेर महाराष्ट्राच्या जलदी क्षेत्रात १० वावाच्या बाहेर मासेमारीला परवानगी मिळावी, १० वावाच्या बाहेरून मासेमारी करून येणाऱ्या पर्ससीन नौकांना बंदरात ये-जा करायला तसेच मच्छी उतरवायला परवानगी मिळावी, नविन परवान्यांबरोबर पर्ससीन नौकांचे जुन्या परवान्यांचे नुतनीकरण करून मिळावे, एकतर्फी कारवाई बंद करावी, सर्व मासेमारी प्रकारांचा अभ्यास झाल्याशिवाय पर्ससीन वर कारवाई करू नये, सोमवंशी अहवालाचा हवाला देवून पर्ससीन नौकांवर जाचक अटी लादल्या जात आहेत, त्या बंद कराव्यात, अशा मागण्या पर्ससीन मच्छिमारांनी शासनासमोर ठेवल्या आहेत.
रत्नागिरी मध्ये पर्ससीन नेट मच्छिमारांच्या आंदोलनात रा. कॉंग्रेसचे जिल्हा महासचिव नौसीन काजी, शिवसेना नगराध्यक्ष बंड्या शेठ साळवी, रा. काँग्रेस नेते माजी नगराध्यक्ष मिलिंद किर, महिला शहराध्यक्षा सौ. नेहाली नागवेकर, रा. कॉंग्रेस युवक तालुकाध्यक्ष सिध्देश शिवलकर, शिवसेना नगरसेवक श्री. साळुंखे, नगरसेवक सुहेल काजी आदींनी सहभागी होवून आंदोलनाला जाहिर पाठिंबा दिला आहे.
यावेळी बशीरभाई मुर्तुजा म्हणाले, मी यापूर्वी सुद्धा मच्छिमारांवर आलेल्या अनेक संकटाच्या काळातील अडचणीत देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांकडे घेवून जायचो. ते त्या अडचणीवर तोडगा काढून त्वरीत सोडवून द्यायचे. त्यामुळेच आजही देखील मला विश्वास आहे की पर्ससीन नेट मच्छिमारांच्या अडचणीवर तोडगा निघेल. तसेच पर्ससीन नेट मच्छिमाराच्या पाठिशी मी कायम उभा राहतच आलो आहे. आणि आजही राहणार आहे. तसेच आमचे नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री उदय सामंत व काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड असे आम्ही सर्व मिळून भेट घेवून पर्ससीन नेट धारकांच्या अडीअडचणी समजून सांगू व लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न देखील करू असे ठणकावून सांगितले. जोपर्यंत पर्ससीन नेट मच्छिमारांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मी स्वतः पर्ससीन नेट मच्छिमारांच्या ठिय्या आंदोलनात सहभागी होणार, असे प्रतिपादन बशीरभाई मुर्तुझा यांनी केले.
यावेळी उद्योजक लिलाधर नागवेकर, बाबामिया मुकादम, मेहताब साखरकर, मच्छिमार नेते नुरूद्दीन पटेल, इमतियाज मुकादम, मझर मुकादम, मेहबूब फडनाईक, हनीफ मालदार, आजीम होडेकर, सिराज वाडकर, समद मजगावकर, नुरमोहम्मद हसनम, यासीन मजगावकर, सुहेल जीवाजी, मसूद मुकादम यांच्यासह शेकडो पर्ससीन सहभागी झाले होते.