शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकरांना धक्का ; देवबाग ग्रा. पं. पोटनिवडणुकीत शाखाप्रमुख पराभूत

भाजप पुरस्कृत अपर्णा धुरी यांचा रमेश कद्रेकर यांच्यावर १९ मतांनी विजय

कुणाल मांजरेकर

मालवण : देवबाग ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांना धक्का बसला आहे. या ठिकाणी भाजप पुरस्कृत उमेदवार अपर्णा धुरी यांनी शिवसेना शाखाप्रमुख रमेश कद्रेकर यांचा १९ मतांनी पराभव केला. खोबरेकर यांनी या निवडणुकीकडे विशेष लक्ष केंद्रित केले होते. मात्र भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेत विजयश्री खेचून आणला. या ग्रामपंचायतीच्या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी एका जागेवर यापूर्वीच भाजपाचे नितीन बांदेकर बिनविरोध निवडून आले होते. त्यापाठोपाठ अपर्णा धुरी यांच्या विजयामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

देवबाग ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ आणि प्रभाग क्रमांक ३ ची पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीत प्रभाग १ मधून भाजपा पुरस्कृत नितीन बांदेकर यांनी बिनविरोध विजय मिळवला होता. प्रभाग ३ साठी भाजपाने अपर्णा धुरी यांना उमेदवारी दिली होती तर शिवसेनेकडून शाखाप्रमुख रमेश कद्रेकर रिंगणात उतरले होते. या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. येथील तहसील कार्यालयात बुधवारी सकाळी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. यामध्ये एकूण ३५० पैकी अपर्णा धुरी यांना १८१ तर रमेश कद्रेकर यांना १६२ मते मिळाली. ७ जणांनी नोटाला मतदान केले. त्यामुळे अपर्णा धुरी १९ मतांनी विजयी झाल्या आहेत.

अपर्णा धुरी – विजयी उमेदवार
नितीन बांदेकर – बिनविरोध विजयी

या निकालानंतर भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, बाबा परब आदींनी सौ. धुरी यांचे अभिनंदन केले. यावेळी तालुका उपाध्यक्ष अवि सामंत, सरचिटणीस महेश मांजरेकर, भाई मांजरेकर, मंदार लुडबे, श्वेतांगी मणचेकर, विलास बिलये, मोहन कुबल, नादार तुळसकर, दाजी कांदळगावकर, तात्या बिलये, जॅक्सन रॉड्रिक्स, रामा चोपडेकर, मुकेश कांदळगावकर, विजय केळुसकर, सहदेव साळगावकर, पंकज मालंडकर, नंदू कुपकर, दत्ता चोपडेकर, संकेत राऊळ आदी उपस्थित होते.

भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस बाबा परब यांनी देवबाग ग्रा. प. पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार अपर्णा धुरी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!