मालवणचा शिवकालीन नारळी पौर्णिमा उत्सव उद्या
मालवण (प्रतिनिधी)
शिवकालीन परंपरेनुसार साजरा होणारा मालवणातील नारळी पौर्णिमा उत्सव रविवारी २२ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. या नारळी पौणिमा उत्सवात सहभागी होण्यासाठी मालवण व्यापारी संघाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षी मोठ्या उत्साहात व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत साजरा होणारा मालवणचा ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सव गतवर्षी कोरोना महामारीमुळे काही मोजक्या व्यापारी बांधवांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता. यावर्षी नारळी पौर्णिमेच्या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे तसेच नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे हा उत्सव कोरोनाचे नियम पाळतानाच उत्साहात साजरा होणार आहे. या ऐतिहासिक उत्सवात सहभागी होण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी दुपारी ३ वाजता हनुमान मंदिर, सोमवार पेठ मालवण येथे उपस्थित रहावे. अन्नदात्या रत्नाकराचे पूजन श्रीफळ अर्पून करण्यासाठी निघणाऱ्या सवाद्य मिरवणूकीत व्यापारी संघाच्या सर्व सदस्यानी सहभागी होऊन या ऐतिहासिक सोहळ्याची शोभा वृद्धींगत करावी, असे आवाहन मालवण व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.