एकनाथ शिंदेंची शिवसेनेत घुसमट ; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे सध्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्ताने राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेत घुसमट होत असून ते केवळ सही पुरतेच मंत्री आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत कंटाळले आहेत.जर एकनाथ शिंदे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे, असं राणे यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या पहिल्या दिवशी मुंबईत बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतले होते. यानंतर शिवसेनेकडून स्मृती स्थळाचे शुद्धीकरण करण्यात आले. यासर्व प्रकारावर भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. आज जन आशीर्वाद यात्रेच्या तिसऱ्या दिवशी शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेने गोमूत्र शिंपडत राहण्यापेक्षा रोजगार द्यावेत. नको ते उद्योग करण्यापेक्षा हवे ते व्यवसाय करावे, असं त्यांनी म्हटलं आहे. यानंतर पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधताना राणेंनी एकनाथ शिंदे यांच्या विषयी मोठा दावा केला आहे. एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सही पुरते आहेत. मातोश्रीशिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर त्यांचं स्वागत आहे, असं सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू, असा दावाही नारायण राणेंनी केला आहे.