दांडेश्वर-किल्ले सिंधुदुर्ग होडी प्रवासी वाहतुकीत स्थानिकांनाच प्राधान्य हवे सन्मेश परब यांची मागणी

मालवण प्रतिनिधी:
दांडेश्वर ते किल्ले सिंधुदुर्ग अशा प्रवासी होडी वाहतुकीस परवानगी मिळाली आहे. येत्या काही दिवसांत ही प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार आहे. मात्र हा प्रवासी होडी वाहतूकीचा व्यवसाय गावाच्या बाहेरील व्यक्तींना न देता तो स्थानिकांच्या, मच्छीमारांच्या हातातच रहावा अशी आमची मागणी आहे असे ठाकरे शिवसेनेचे उप शहरप्रमुख सन्मेश परब यांनी पत्रकात म्हटले आहे.
शहरातील दांडी येथील दांडेश्वर मंदिर ते किल्ले सिंधुदुर्ग अशी बंद असलेली प्रवासी होडी वाहतूक सेवा सुरू व्हावी यासाठी मेघनाद धुरी, रुपेश प्रभू, अन्वय प्रभू यांच्यासह अन्य स्थानिक व्यवसायिकांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश मिळाले असून दांडेश्वर ते किल्ले सिंधुदुर्ग अशा प्रवासी होडी वाहतुकीस शासनाने परवानगी दिली आहे. मात्र याठिकाणी स्थानिकांऐवजी बाहेरील व्यक्तींचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. या प्रवासी होडी वाहतूकीचा फायदा स्थानिक, मच्छीमार, गावातील जे बेरोजगार आहेत यांना व्हावा यासाठी आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे हा व्यवसाय बाहेरील व्यक्तींना न देता स्थानिकांच्या, मच्छीमारांच्या हातातच रहावा अशी आमची ठाम मागणी असल्याचे श्री. परब यांनी स्पष्ट केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 4213

Leave a Reply

error: Content is protected !!