भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांची महावितरणच्या कार्यालयात धडक


देवबाग, तारकर्ली, वायरी परिसरात स्वतंत्र वीज उपकेंद्र उभारा स्थानिक व्यावसायिकाची मागणी
मालवण प्रतिनिधी :

ऐन पर्यटन हंगामात देवबाग, तारकर्ली, वायरी परिसरात अत्यंत कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे या भागात स्वतंत्र वीज उपकेंद्र तसेच नव्याने बसविण्यात आलेल्या विद्युत रोहित्रांची जोडणी आणि निकृष्ट दर्जाच्या भूमिगत वीज वाहिनीच्या कामाच्या संदर्भात संतप्त बनलेल्या तिन्ही गावातील पर्यटन व्यवसायिकांनी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत आणि तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली आज येथील महावितरणच्या कार्यालयाला धडक देत अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार याला चांगलेच धारेवर धरले.
दरम्यान संबंधित ठेकेदाराने कामगारांची स्वतंत्र तीन गॅंग घेऊन ट्रान्सफॉर्मरची जोडणी करण्याचे काम येत्या आठ दिवसात पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन संबंधित पर्यटन व्यवसायिक ग्रामस्थांना दिले. यावर दिलेल्या मुदतीत ट्रान्सफॉर्मरची जोडणी तसेच भूमिगत वीज वाहिन्या घालण्याचे काम पूर्ण न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा पर्यटन व्यावसायिक, ग्रामस्थांनी यावेळी दिला.
सध्या पर्यटन हंगाम शेवटच्या टप्प्यात आला आहे. अशा परिस्थितीत पर्यटन राजधानी असलेल्या मालवण तालुक्यातील देवबाग, तारकर्ली, वायरी या परिसरात गेले काही दिवस कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे पर्यटकांचे बुकिंग घेऊनही कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे त्यांना अत्यावश्यक सुविधा देताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यात व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. या तिन्ही गावासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र देण्यात यावे अशी मागणी यापूर्वीही सातत्याने करण्यात येत होती. मात्र महावितरणकडून त्याची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे या समस्येमुळे संतप्त बनलेल्या देवबाग, तारकर्ली, वायरी येथील पर्यटन व्यावसायिक तसेच स्थानिक ग्रामस्थांनी आज सकाळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत व तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरणच्या कार्यालयाला धडक दिली. यावेळी महावितरणचे अभियंता सचिन मेहेत्रे, शाखा अभियंता, संबंधित ठेकेदार यांच्यासह दाजी सावजी, बाबू धुरी, रवींद्र खानविलकर, मिलिंद झाड, मिथिलेश मिठबावकर, प्रफुल्ल मांजरेकर, महेंद्र चव्हाण, मुन्ना झाड गणेश सातार्डेकर, मनोज खोबरेकर, वैभव सावंत, श्री. लोकेगावकर, बाळू वायंगणकर, रामा चोपडेकर, श्री. तारी, श्री. माडये, दर्शन वेंगुर्लेकर, अभय पाटकर, शंकर वायंगणकर यांच्यासह अन्य पर्यटन व्यावसायिक तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या तिन्ही गावात सध्या कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्यामुळे पर्यटकांची जी गैरसोय होत आहे. त्याचबरोबर नव्याने काही दिवसांपूर्वीच ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहे त्याची जोडणी अपूर्ण आहे. शिवाय भूमिगत वीज वाहिन्या बसवण्याची जी कार्यवाही सुरू आहे त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून या कामासाठी रस्त्यांची झालेल्या खोदाईमुळे वाहनांचे अपघातही घडत आहेत. या सर्व समस्यांबाबत अशोक सावंत, सहदेव साळगावकर यांच्यासह पर्यटन व्यावसायिकांनी महावितरणचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत येणाऱ्या पर्यटकांना वीज पुरवठ्याची समस्या भेडसावत असेल तर आम्ही व्यवसाय करायचा कसा? वीज बिलांच्या वसुलीसाठी अधिकारी व्यावसायिकांच्या घरी ठाण मांडून बसतात यात बिल भरून घेण्यासंदर्भात कोणतीही तडजोडही केली जात नाही. पर्यटन व्यवसायिक महावितरणला तसेच जी कामे या भागात सुरू आहेत त्या कामांसाठी चांगले सहकार्य करत असतानाही काम जर वेळेत पूर्ण होत नसेल तर त्याला महावितरण आणि संबंधित ठेकेदार जबाबदार आहे. जर हे काम लवकर मार्गी लागत नसेल तर आम्ही गावात वीज पुरवठ्याअभावी येथील पर्यटन व्यवसाय बंद असे फलक लावू असा संतप्त इशाराही यावेळी पर्यटन व्यवसायिकांनी दिला.
यावेळी आक्रमक बनलेल्या पर्यटन व्यवसायिकांनी जोपर्यंत भूमिगत वीज वाहिन्या तसेच नव्याने बसवण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरची जोडणीचे काम आठ दिवसात पूर्ण होत नाही तोपर्यंत अधिकाऱ्यांना तसेच ठेकेदाराला कार्यालयाच्या बाहेर जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. देवबाग, तारकर्ली येथे भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे जे काम सुरू आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. भूमिगत वीज वाहिन्या प्रत्यक्ष चार फुटापेक्षा जास्त खाली घालणे आवश्यक असताना त्या दीड फुटाच्या अंतरावरच घालण्यात येत आहेत. स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहता यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची ही शक्यता आहे. महावितरणच्या शाखा अभियंत्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने याची पाहणी करून या भूमिगत वीज वाहिन्या चार फुटाच्या खालीच घालाव्यात अशी जोरदार मागणी पर्यटन व्यवसायिकांनी केली. हे काम करत असताना स्थानिक पर्यटन व्यवसायिकांचे तसेच स्थानिकांचे सहकार्य महावितरण तसेच संबंधित ठेकेदारास राहील. मात्र काम दर्जेदार व्हायला हवे असे आमची मागणी आहे. या कामांना कोणी आडकाठी करत असेल किंवा पैशाची मागणी करत असेल तर संबंधित ठेकेदाराने संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा. आमचे त्याला पूर्ण सहकार्य राहील असे तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
सध्या पर्यटन हंगाम सुरू असल्याने सकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ या तिन्ही गावातून होत असते. या बाबीचा विचार करता भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम रात्री बारा ते सकाळी सहा या वेळेत करण्यात यावे. त्याचबरोबर वीज वाहिन्या घालण्यासाठी रस्त्याच्या बाजूने जी खोदाई करण्यात येत आहे ती बुजवण्याची कार्यवाही ही तत्काळ करण्यात यावी जेणेकरून अपघात टाळण्यास मदत होईल. असे पर्यटन व्यवसायिकांनी यावेळी स्पष्ट केले. पर्यटन हंगाम अंतिम टप्प्यात आल्या असल्याने ही कामे येत्या आठ दिवसात पूर्ण करण्यात यावीत अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. ही कामे तत्काळ मार्गी लावण्यासाठी कामगारांची संख्या वाढविणे आवश्यक आहे असे अशोक सावंत यांनी सांगितले तसेच संबंधित ठेकेदाराने याची कार्यवाही करून पर्यटन व्यवसायिकांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्याची गांभीर्याने दखल घ्यावी असे स्पष्ट केले.
यावेळी झालेल्या चर्चेत संबंधित ठेकेदाराने या तिन्ही गावातील नवीन ट्रान्सफॉर्मर तसेच भूमिगत वीज वाहिन्या घालण्याचे काम कामगारांच्या नवीन तीन गॅंगच्या माध्यमातून येत्या तीन दिवसात पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन यावेळी पर्यटन व्यवसायिक तसेच पदाधिकाऱ्यांना दिले.

