सर्वधर्म समभावाचे प्रतिक मोहरम ताजीया उत्सव मालवणात उत्साहात साजरा
मालवण : मालवणात सर्वधर्म समभावाचे प्रतिक म्हणून ओळखला जाणारा ऐतिहासिक मोहरम ताजीया उत्सव शुक्रवारी पारंपरिक प्रथेप्रमाणे उत्साहात साजरा झाला. किल्ले सिंधुदुर्ग आणि मालवण वासीयांच्या ऐक्याचे प्रतिक म्हणून ‘मोहरम ताजियाकडे’ शिवकालीन उत्सव म्हणूनही पाहिले जाते.
किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याजवळ किल्ल्याच्या रक्षणासाठी असलेले किल्लेदार मुस्लिम बांधव यांच्यासाठी सर्वधर्म समभावाचे प्रतिक असणारा मोहरमताजिया उत्सव छत्रपती शिवरायांपासून ३५० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून मालवणात हिंदू मुस्लिम बांधवांच्या वतीने साजरा होत आहे. पाच पवित्र आत्म्यांचे (पंज्जे) प्रतिक म्हजेच ताबूत मानले जाते. शुक्रवारी दुपारी किल्ले सिंधुदुर्ग येथील मुस्लिम हिंदू बांधव एकत्र येत छत्रपती शिवराजेश्वर मंदिरात ताबूत आणण्यात आले. यावेळी शिवराजेश्वर मंदिरात फातीय (प्रार्थना) करण्यात आली. यानंतर शिवराजेश्वर मंदिरा सभोवताली ताबूत मिरवणूक झाल्यानंतर होडीच्या सहाय्याने मालवण मेढा येथे पिराची भाटी याठिकाणी आणण्यात आली. याठिकाणी आणखी एक ताबूत सजवून होता.दरवर्षी मालवण मेढा येथून बाजारपेठ भरड मार्गे फोवकांडा पिंपळ ते मेढा राजकोट अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. यावर्षी कोरोना खबरदारीचे नियम पाळून उत्सव साजरा झाला