खवले मांजरास जीवदान !

वनविभागाने मानले ग्रामस्थांचे आभार

झुंजार पेडणेकर

वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर घोडेमुख येथे विहिरीत पडलेल्या खवले मांजरास ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने जीवदान दिले आहे. शनिवारी सकाळी ६.३० च्या दरम्यान येथील भगवान वासुदेव गावडे यांना त्यांच्या घरामागील कठडा नसलेल्या विहिरीत खवले मांजर पडले असल्याचे दिसून आल्याने त्यांनी पेंडूर घोडेमुख सरपंच श्रीम. गीतांजली कांबळे यांच्या माध्यमातून वनविभागास याबाबत माहिती दिली. वनविभागाच्या बचावपथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत १० ते १२ फूट खोल विहिरीतून त्या खवले मांजरास स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढत जीवदान दिले आहे.


या खवलेमांजराची पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करणेत आले.यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ अमृत शिंदे म्हणाले, आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्करी होण्याऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये खवले मांजराचं प्रमाण अधिक असल्याचं WWF या आंतरराष्ट्रीय संस्थेने निरीक्षण नोंदविले आहे. तसेच इंटरनेशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर या संस्थेनेही खवले मांजरास रेड लिस्ट यादीत वर्गीकृत केले आहे.
या अतिशय दुर्मिळ, संकटग्रस्त अद्वितीय सस्तन प्राण्याच्या संरक्षणसाठी शासन विविध स्तरावर प्रयत्नशील असून त्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे अनुसूची १ मध्ये वर्गीकृत केले असल्याने त्यास संरक्षण प्राप्त आहे. खवले मांजर शिकार/तस्करी करिता ७ वर्ष इतक्या कारावासाची तसेच द्रव्यदंडाचीही तरतूद करणेत आलेली आहे.


पेंडूर घोडेमुख येथील ग्रामस्थांनी खवले मांजराचा जीव वाचवून वन्यप्राण्यांबाबत असणाऱ्या संवेदनशीलता आणि आत्मीयतचं चांगलं उदाहरण समाजासमोर ठेवलं असलेने वनविभागाच्या वतीने सर्वांचं कौतुक करून आभार मानण्यात आले. सिंधुदुर्गवासीयांच्या वन्यजीवांबद्दल असणाऱ्या प्रेमाची पुन्हा एकदा प्रचिती आली. हे बचाव कार्य उपवनसंरक्षक सावंतवाडी श्री शहाजी नारनवर, सहायक वनसंरक्षक (खा कु तो व वन्यजीव) सावंतवाडी श्री आय. डी. जालगावकर व वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ श्री. अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मठ श्री. अ. स. चव्हाण, वनरक्षक मठ श्री. सूर्यकांत सावंत, वनमजुर श्री. संतोष इब्रामपुरकर, वाहनचालक राहुल मयेकर यांनी स्थानिक ग्रामस्थ देवा कांबळी, विजय मोरजकर, श्याम गावडे, गोविंद गावडे, शांताराम गावडे, रविंद्र गावडे महेश नाईक यांच्या मदतीने यशस्वी केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!