एमटीडीसीचे जल पर्यटन सल्लागार डॉ. सारंग कुलकर्णी यांचा तडकाफडकी राजीनामा !

पर्यटन महामंडळातील अंतर्गत कुरघोडीतून निर्णय ? ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाकांक्षी पाणबुडी आणि अंडर वॉटर आर्टिफिशल रिफ प्रकल्पाला ब्रेक लागण्याची भीती 

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी पर्यटनाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सागरी संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांनी एमटीडीसीच्या जल पर्यटन सल्लागार पदाचा राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या पर्यटन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. पर्यटन महामंडळातील अंतर्गत कुरघोडीमुळे डॉ. कुलकर्णी यांनी राजीनामा दिल्याची चर्चा असून सागरी पर्यटनाचा मोठा अभ्यास असलेल्या डॉ. सारंग कुलकर्णी यांच्या राजीनाम्यामुळे सिंधुदुर्गातील बहुचर्चित पाणबुडी आणि अंडर वॉटर आर्टिफिशियल रीफ हे दोन्ही प्रकल्प पुन्हा एकदा रखडण्याची भीती निर्माण झाली आहे.

नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाल्या नंतर नोकरशाहीच्या फेरबदलात, महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय कार्यक्षमतेला अनुकूल करण्यासाठी काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांची पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागात सचिव (पर्यटन) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाटणे यांच्या नियुक्तीला आठवडा झाला नाही तोच डॉ. सारंग कुलकर्णी यांनी राजीनामा दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

अंदमान येथे सागरी जीव संशोधक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सारंग कुलकर्णी याची २००६ साली एमटीडीसी सोबत स्नॉर्कलिंग प्रशिक्षक म्हणून नाळ जुळली होती. महाराष्ट्राचे तत्कालीन पर्यटन सचिव भूषण गगराणी यांनी सिंधुदुर्ग मध्ये काम करण्यास त्यांना आमंत्रित केले होते. स्कूबा पर्यटनाचा फायदा स्थानिकांनाचा झाला पाहिजे म्हणून वेळोवेळी स्थानिकांना प्रशिक्षण कार्यक्रम त्यांनी राबविले. पर्यटनाच्या अनेक नावीन्यपूर्ण संकल्पना मांडण्यात त्यांनी महाराष्ट्र सरकार मध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. कुलकर्णी यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे कोकणाच्या पर्यटनाचे मोठे नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3975

Leave a Reply

error: Content is protected !!