ठाकर समाजाच्या जात पडताळणीसाठी होणाऱ्या विलंबाची आ. निलेश राणेंनी घेतली गंभीर दखल
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती सहआयुक्तांची तात्काळ बदली करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना निवेदन
मालवण | कुणाल मांजरेकर
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील जात पडताळणी समितीचे काम अत्यंत दिरंगाईने व अडवणुकीने सुरु असुन त्याचा त्रास येथील लोकप्रतिनिधी, ठाकर समाजातील विद्यार्थ्यांना व शासकीय कर्मचा-यांना होत आहे. याची कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती सहआयुक्त कोकण विभाग दिनकर पावरा हे आर्थिक अपेक्षा ठेवून व जाणीवपूर्वक अडवणुक करून ठाकर समाजातील विद्यार्थी, लोकनियुक्त प्रतिनिधी, नोकरवर्ग यांना जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत दिरंगाई करत असल्याने त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी येत होत्या. त्यांच्या या वृत्तीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे दिनकर पावरा यांची तातडीने बदली करुन सक्षम अधिका-याची नियुक्ती करण्याचे निर्देश द्यावेत, अशा मागणीचे निवेदन आ. राणे यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना दिले आहे.