सर्जेकोट पिरावाडी येथील युवकाचा आकस्मिक मृत्यू
मालवण : सर्जेकोट पिरावाडी येथील निलेश रमेश आडकर (वय ३४) याचे सोमवारी सायंकाळी आकस्मिक निधन झाले. तो आपल्या मित्र परिवारासोबत क्रिकेट खेळत असताना अचानक जमिनीवर कोसळला होता. त्याला मित्रांनी तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात येत असताना त्याचा मृत्यू झाला.
त्याच्या निधनाने कुटुंबियांना आणि मित्र परिवाराला धक्का बसला आहे. त्याच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तो अविवाहीत होता. त्याच्यामागे आई, तीन बहिणी, भावजी, काका, पुतणे असा परिवार आहे. निलेश याला क्रिकेटची आवड होती. तो नेहमी संध्याकाळी क्रिकेट खेळण्यासाठी जात असे. काल असाच संध्याकाळी क्रिकेट खेळत असताना तो जमिनीवर कोसळला. त्याला शहरातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यानंतर कुडाळ येथे सिटीस्कॅन केल्यानंतर गोवा येथे त्याला हलविण्यात येत होते. यावेळी वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू ब्रेन हॅम्बरेजमुळे झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.