२८८ मतदार संघात कुडाळ मालवण मतदार संघ “टॉप फाईव्ह” मध्ये राहण्यासाठी माझे प्रयत्न
मालवण शहर पाणी पुरवठा योजना नूतनीकरण प्रसंगी आमदार निलेश राणे यांचे प्रतिपादन
अधिकाऱ्यांनी प्रामाणिक काम करा, निधी कमी पडू देणार नाही हा माझा शब्द
मालवण शहर विकासाच्या अनेक संकल्पना ; वीज पुरवठ्यातील समस्या सोडवण्यासाठी पॉवरग्रीड आणणार
पाच वर्षात असं काम करून दाखवेन की मध्यंतरीचा दहा वर्षाचा ओसाड काळ स्मरणातही राहणार नाही
माझ्या अगोदरच्या आमदारांची केवळ बजेटमध्ये उल्लेख करून घेण्याची मर्यादा ; निधीची तरतूद आम्ही केली ; पाणी पुरवठा योजनेचे श्रेय लाटू पाहणाऱ्यांना टोला
मालवण | कुणाल मांजरेकर
निवडणुकीवेळीच कुडाळ मालवण मतदार संघ राज्यातील २८८ पैकी पहिल्या पाच मतदार संघात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द मी दिला होता. आता निवडून आल्यानंतर याच दृष्टीने माझे प्रयत्न सुरु झाले आहेत. अधिकाऱ्यांनी प्रामाणिक काम करा, विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही हा माझा शब्द आहे. मालवण शहर विकासाच्या माझ्या अनेक संकल्पना असून मध्यंतरी तोक्ते वादळात मालवणचा वीज पुरवठा तीन ते चार दिवस बंद राहिला होता. पुन्हा अशी समस्या निर्माण होऊ नये यासाठी शहरात पॉवरग्रीड आणण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. आणि ते आणणारच, असे सांगून पाच वर्षात असं काम करून दाखवेन की मध्यंतरीचा दहा वर्षाचा ओसाड काळ येथील जनतेच्या स्मरणातही राहणार नाही, असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी मालवण शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या नूतनीकरण आणि विस्तारीकरण भूमिपूजन प्रसंगी बोलताना केले. या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. पण माझ्या अगोदरच्या आमदारांची केवळ बजेटमध्ये उल्लेख करून घेण्याची मर्यादा होती. त्यासाठी निधीची तरतूद ते करू शकले नाहीत. म्हणून दहा वर्षे हे काम रखडले होते. ही निधीची तरतूद आम्ही केली, म्हणून आम्ही आज या कामाचे भूमिपूजन करीत आहोत, असे निलेश राणे म्हणाले.
मालवण नगरपरिषदेच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियाना अंतर्गत मालवण शहर पाणी पुरवठा योजनेच्या नूतनीकरण आणी विस्तारीकरणासाठी ४३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सोमवारी या कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, आनंद शिरवलकर, बबन शिंदे, राजा गावकर, विश्वास गावकर, महेश कांदळगावकर, राजू वराडकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, सोनाली पाटकर, राकेश सावंत, निशय पालेकर, ललित चव्हाण तसेच अभिषेक इन्फ्राचे अभिषेक घाग, निशांत घाग, विनोद भुरण, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार डी पी. पाटकर आणि अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, पालिकेचे अधिकारी, अभिषेक इन्फ्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून १९९९ साली मालवण शहरासाठी धामापूर नळपाणी योजना मंजूर झाली. यानंतरच्या कालावधीत शहराची लोकसंख्या वाढून देखील या योजनेचा विस्तार झाला नव्हता. या कामासाठी निधीची तरतूद होत नसल्याने हे काम अडकले होते. मात्र खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. मध्यंतरी निलेश राणे यांनी मालवण नगरपालिकेला भेट देऊन या कामाचा आढावा घेत तात्काळ हे काम सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सोमवारी या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. कुंभारमाठ येथील जल शुद्धीकरण केंद्र येथे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडल्यानंतर नगरपरिषद वाहनतळ, भरड मालवण येथे या भूमिपूजनाच्या निमित्ताने छोटेखानी सभा पार पडली. प्रारंभी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी आमदार निलेश राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर नळपाणी योजनेच्या सद्य परिस्थितीचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करण्यात आले. तर मुख्याधिकारी संतोष जिरगे यानी प्रस्ताविक करताना पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी निलेश राणे म्हणाले, या पाणीपुरवठा योजनेच्या कामात अनेक अडथळे आले होते. ते सगळे पार पाडून आज या योजनेचे भूमिपूजन झालेले आहे. आमदार झाल्यानंतर मी जेव्हा शहराचा आढावा घेतला, त्या शहराच्या आढाव्यामध्ये अनेक वर्षांपासून लहान लहान कामे अडकल्याचे दिसून आले. आजचे काम मोठे आहे. त्यासाठी ४३ कोटीची तरतूद आहे. पण लहान लहान कामे चर्चेच्या माध्यमातून सोडवली गेली पाहिजे होती. पण ती झाली नाहीत. यापुढील काळात जे पाठबळ प्रशासनाला हवं ते मी देतो. तुम्ही काम करा, तुम्ही कामाला सुरुवात करा. ही कामे कुठेही अडकणार नाही हा आमदार या नात्याने मी तुम्हाला शब्द देतो. आपण २१ व्या शतकात राहतोय हे डोक्यात ठेवून आपण काम केलं पाहिजे. १९९९ मध्ये राणेसाहेबांनी योजना आणली. त्याच्यानंतर मागच्या दहा वर्षांमध्ये त्याची दुरुस्ती झाली नसल्यामुळे आपल्याला वाढीव खर्च या योजनेतून करावा लागत आहे. आपण ज्या शहरामध्ये राहतोय तेथील योग्य आहे की नाही, दर्जेदार होते की नाही याकडे नागरिकांनी देखील लक्ष देणे आवश्यक आहे.
निवडणुकीच्या काळात पण मी आपल्याला सांगत होतो की दहा वर्ष हा मतदारसंघ ओसाड पडला होता, त्याला आपल्याला नवीन दर्जा देण्यासाठी भरपूर काम करणं गरजेचे आहे. आज ही फक्त एक योजना सुरू झाली किंवा त्याचा शुभारंभ झाला आणि येत्या २४ महिन्यांमध्ये त्याचं काम पूर्ण होईल ही खात्री तुम्हाला या व्यासपीठावरून देतो. आपल्याला मतदार संघांमध्ये जे काम करायचे ते दर्जेदार करायचे आहे. यापूर्वी कधी कुडाळ मालवणचे विषय त्या सभागृहात कोणी पोटतिडकीने मांडले नव्हते. अनेक गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळात करायच्या आहेत, असे निलेश राणे म्हणाले.
विरोधकांनी पाणी पुरवठा योजनेचे श्रेय घेणे चुकीचे !
या योजनेवर काही लोकांनी टीका केली. म्हणे माझ्या अगोदरच्या आमदारांनी ही योजना आणली. हे साफ खोटं आहे. १९९९ मध्ये ही योजना आली. त्याच्यानंतर जे मेंटेनन्स व्हायला पाहिजे होतं, ते झालं नाही, म्हणून आपल्याला आता हे काम कराव लागतंय. या कामासाठी जो ४३ कोटीचा निधी आहे, याचा अनेक बजेटमध्ये उल्लेख झाला असेल. पण त्यासाठी निधीची तरतूद नव्हती. याबाबतचं उदाहरण द्यायचं झाल्यास महाराष्ट्राच्या अनेक बजेटमध्ये मुंबईमध्ये मराठी भवन होणार याची तरतूद होते, उल्लेख होतो. १९६० मध्ये जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली, तेव्हापासून कदाचित ९०% बजेटमध्ये मुंबईत मराठी भवन होणार असा उल्लेख आहे. पण या मराठी भवनाची पहिली वीट लागली ती जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा. त्याप्रमाणे माझ्या अगोदरचे जे आमदार होते, ते तुम्हाला कागदपत्र दाखवू शकतात. की उल्लेख आहे पण तरतूद कुठे आहे. तरतूद आम्ही केली. ती तरतूद तुम्ही केला असता तर एवढी लोक तुमच्यासाठी जमली असती. मागच्या दहा वर्षात ती का झाली नाही ? मालवण शहराला ७००० पाणी कनेक्शनची गरज आहे. पण आपण ११०० वर आहोत. हा मोठा गॅप आहे. येणाऱ्या अडीच वर्षात हा गॅप आपल्याला भरायचा आहे. कुठे कनेक्शन द्यायचे असतील तिकडे द्या. जे काय लागेल शासनाकडून सगळे आणून द्यायची तयारी माझी आहे, असे सांगून मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या कामाचे निलेश राणे यांनी कौतुक केले. २३ नोव्हेंबर २०२४ पासून नवीन जिरगे साहेब दिसले, असे ते म्हणाले.
मालवण शहर विकासाच्या अनेक संकल्पना
या शहरांमध्ये अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत. अनेक गोष्टी राहून गेलेल्या आहेत, संकल्पना आहेत, त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. मालवणात तोक्ते वादळ काळात ४८ तासापेक्षा जास्त काळ लाईट नव्हती. हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एक नवीन पॉवरग्रीड शहरात आणावं लागेल. जिथे पावसाळा जास्त आहे जिथे वादळ जास्त येतात. त्या शहरांमध्ये पॉवर ग्रीड आणले जाते. मी तो आणायच्या प्रयत्नात आहे. परत कधी कुठलातरी चक्रीवादळामुळे मालवणची लाईट जाता कामा नये म्हणून नवीन टेक्नोलोजी आणायचा माझा प्रयत्न आहे. आणी तो आणणारच. अनेक उपक्रम अजून इकडे राबवायचे आहेत. आज हा जरी ४३ कोटीचा प्रकल्प आपण सुरू केला असला तरी अनेक उपक्रम येणाऱ्या काळात आपल्याला दिसतील. रॉक गार्डन पण आपण घेणार आहोत. इकडे पर्यटक मोठ्या प्रमाणात जातात. तिथे गेल्यानंतर त्यांना जे बघायचं आहे, ते दाखवलं पाहिजे. त्यांना काहीतरी वास्तू तयार करून दिली पाहिजे. मला असं वाटतं. आपण मीटिंग घेतल्या नंतर आपण ४८ तासांमध्ये कारंजा सुरू केला. असे अनेक लहान लहान उपक्रम आपल्याला करायचे आहेत. बोर्डिंगच्या बाजूला बंद असलेला हायमस्ट टॉवर तात्काळ सुरु झाला. असे अनेक उपक्रम जर निलेश राणे पंधरा दिवसात करू शकतो तर मागच्या दहा वर्षात का होऊ शकले नाही हा तुमच्यासमोर प्रश्न पडला असेल. पण मी तुम्हाला खात्री देतो, शब्द देतो. येणाऱ्या पाच वर्षांमध्ये असं काम करून दाखवीन की मागची दहा वर्षे आपल्याला ध्यानात सुद्धा येणार नाही, आपल्या स्मरणात सुद्धा राहणार नाही. ठेकेदार यांनी दर्जेदार काम करा आणि लवकरात लवकर २३ महिन्यात जर तुम्ही काम संपवलं तर तुमचं अभिनंदन करू, तुमचं कौतुकच करू. पुढची शंभर दीडशे वर्ष तुमच्या कामाच कौतुक होईल असं काहीतरी काम आपल्या हातातून घडू दे. असे ते म्हणाले.