आगामी निवडणूक महायुतीसाठी जेवढी महत्वाची तेवढीच जनतेसाठी !

खोटले येथील गावभेट कार्यक्रमात खा. नारायण राणे यांचे प्रतिपादन ; जिल्ह्यात रोजगार उपलब्धतेसाठी माझे प्रयत्न

मालवण | कुणाल मांजरेकर

आगामी विधानसभेची निवडणूक जेवढी महायुतीसाठी महत्वाची आहे, जनतेसाठी देखील तेवढीच महत्वाची आहे. राज्याला कोणत्या दिशेने पुढे न्यायचे हे या निवडणुकीत ठरले जाणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येण्यासाठी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून निलेश राणे यांच्या धनुष्यबाण निशाणी समोरील बटण दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे यांनी खोटले येथील गावभेट कार्यक्रमात केले. जिल्ह्यात आज शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून आता रोजगार निर्मितीसाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. दोडामार्गात ५०० कारखाने आणले जात असून यातून जिल्ह्यातील एक लाख भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळणार आहेत. त्यातून आपला जिल्हा आर्थिक समृद्धी येईल, असेही ते म्हणाले.

मालवण तालुक्यातील खोटले गावात खा. नारायण राणे यानी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. प्रारंभी येथील रवळनाथ मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. यावेळी निलेश राणे विजयी होण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने साकडे घालण्यात आले. यानंतर खा. राणे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी वायंगवडे सरपंच विशाखा सकपाळ, उपसरपंच विनायक परब, माजी सरपंच आनंद सावंत, रणजित परब, महादेव परब, अमित ठाकूर, विशाल सावंत, प्रभाकर परब, गणेश घाडीगांवकर, निलकंठ वंजारे, काशीराम परब, ज्ञानेश्वर परब, चंद्रकांत परब, उमेश पुजारे, विजय सकपाळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी खा. नारायण राणे म्हणाले, येथील ग्रामस्थांचा माझ्यावर हक्क आहे. तुमच्यामुळेच मी सहा वेळा निवडून आलो. मला आजवर ११ पदे मिळाली. ही सर्व देखिल तुमच्यामुळेच मिळाली. त्यामुळे रस्ते, पाणी प्रश्न सोडवल्यानंतर जिल्ह्याची प्रगती व्हावी, यासाठी वेगवेगळे प्रकल्प येथे आणण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. या जिल्ह्याचा विकास करणे माझे कर्तव्य आहे. या जिल्ह्याचा विकास व्हावा यासाठी मी स्वखर्चाने मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल बांधले. कणकवलीत इंजिनिअरिंग कॉलेज बांधले. मी तुमच्या घरातला माणूस आहे. तुमच्यासाठी साहेब होणार नाही. मी सेवक आहे मला जनतेची सेवा करायची आहे. १९९० पूर्वी इकडे वीज, पाणी सोय नव्हती. ती केल्यानंतर आता लोकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी मी प्रयत्न करीत आहेत. दोडामार्गमध्ये 500 कारखाने येणार आहेत. त्यात १ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून त्यात स्थानिकांना प्राधान्य मिळण्यासाठी ओरोसला मी ट्रेनिंग सेंटर सुरु केले आहे. जिल्ह्याचा विकास हे माझे स्वप्न असल्याचे सांगून आगामी निवडणुकीत एकजुटीने निलेश राणे यांना मतदान द्या. भविष्यात गावात काहीतरी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला जाईल, असे ते म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3813

Leave a Reply

error: Content is protected !!