वैभव नाईक दहा वर्षात पूर्णपणे अपयशी ; त्यामुळे “आमदार आता बस्स झालं” म्हणण्याची वेळ !
माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांची टीका ; वैभव नाईकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही
मालवण शहरातून महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना ८० % मतदान होण्याचा विश्वास
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे. मागील दहा वर्षात वैभव नाईक यांची कारकीर्द पूर्णपणे अपयशी ठरली असून शहारात विकास कामांच्या नावांवर फक्त सांगाडे उभे करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे आमदार आता बस्स झालं, असं म्हणायची वेळ आली आहे. विकासाचे कोणतेही व्हिजन नसलेला आमदार म्हणून वैभव नाईकांची ओळख बनली असून शहरात स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, भाजी मार्केट, रॉक गार्डन, फायर फायटर इमारत अशा अनेक गोष्टी आज अर्धवट स्थितीत असल्याने आमदारांच्या कामाबाबत प्रचंड असंतोष नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे शहरात परिवर्तनाचे वारे वाहत असून शहरातून ८० % मतदान महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरात सर्व प्रभागात महायुतीच्या वतीने प्रचार फेऱ्या पूर्ण झाल्या असून मतदारांचा प्रतिसाद पाहता २३ नोव्हेंबरला विजयाचा जल्लोष महायुतीच करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तालुका भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, दीपक पाटकर, महेश सारंग, जगदीश गावकर, आबा हडकर, नंदू देसाई, चारुशीला आचरेकर, जॉन नरोन्हा, किशोर खानोलकर, आचरेकर आदी उपस्थित होते. श्री. आचरेकर म्हणाले, मालवण नगरपालिकेला आवश्यक निधी न मिळाल्याने मामा वरेरकर नाट्यगृहाची दुरुस्ती होऊ शकली नाही. तसेच अंतर्गत कामासाठी देखील निधी आलेला नाही. त्यामुळे आज रंगमंचाला गळती लागली असून अनेक खुर्च्या नादुरुस्त झालेल्या आहेत. नारायण राणे यांनी या नाट्यगृहाला साडेतीन कोटींचा निधी दिला. मात्र त्याच्या दुरुस्ती साठी निधी आमदार वैभव नाईक हे देऊ शकलेले नाहीत. भाजी मंडई, अग्निशमन इमारत, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स याचीही दुरावस्था झाली आहे. नारायण राणे यांनी देशातील पहिले रॉक गार्डन उभारले. पण आमदारांनी आपल्या समर्थक आमदाराच्या हातात याची देखभाल दुरुस्ती दिल्याने रॉक गार्डन बकाल झाले आहे. येथे कोणत्याही सुविधा नाहीत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील उबाठाच्या उमेदवाराला आराम देण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे, असे आचरेकर म्हणाले.
नारायण राणे यांनी केलेली कामे आजही लोकांसमोर आहेत. आणी ती उभी आहेत. तसेंच विनायक राऊत, वैभव नाईक यांनी विकासाच्या नावावर केलेला भकास लोक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. त्यामुळे राणेंवर टीका करण्यापूर्वी विरोधकांनी आपली पत निर्माण करावी. महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी दोन वर्षांच्या महायुती सरकारच्या सत्ता काळात कोट्यावधीचा निधी मालवण शहरात आणला आहे. त्यामुळे शहरातील अनेक रस्ते सुसज्ज झाले असून आम्ही आणलेल्या निधीचे श्रेय घेण्यासाठी विरोधकांची धडपड सुरु आहे. मागील दहा वर्षात निधी आणण्यात अपयशी ठरलेल्या आमदारांना मते मागण्याचा अधिकारच राहिलेला नसल्याचे श्री. आचरेकर यांनी म्हटले आहे.