विक्रेत्याकडून फळांवर थुंकण्याचा प्रकार अनावधानाने ; सरसकट गैरसमज पसरवणे चूकीचे !
मालवणात झालेल्या शांतता कमिटीची बैठकीत मतप्रवाह ; सोशल मिडीयावर जातीय किंवा धार्मीक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट टाकल्यास कायदेशीर कारवाई : पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांचा इशारा
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरातील बसस्थानकानजिक फळ विक्रेत्याकडून फळांवर थुंकल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मालवणात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. फळ विक्रेत्याकडून सदरचा प्रकार गुटखा खाऊन बोलताना फवारा उडून फळावर पडल्याने झालेला आहे. ही घटना अनावधानाने घडलेली असून त्याने तो हेतूपूर्वक केला नसल्याचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे सरसकट सर्व फळविक्रेते यांच्याबद्दल गैरसमज पसरवणे चुकीचे असल्याची भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे सोशल मीडियावर कोणीही जातीय किंवा धार्मीक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट टाकू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी केले आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यावर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
अनधिकृत फळ विक्री, स्वच्छता, विक्री ठिकाणे निश्चित करणे, फेरीवाले ट्रॅफिक समस्या इत्यादी समस्यांबाबत नगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या समन्वयाने काही उपाययोजना तातडीने करण्याचे ठरवण्यात आले आहे. यामध्ये सर्व फळ विक्रेता, भाजीपाला विक्रेता, फेरीवाले यांनी नगरपालिका किंवा ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थाकडून विक्री / व्यवसायपरवाना घेणे बंधनकारक आहे. सर्व विक्रेता यांचे चरित्र पडताळणी करणे बंधनकारक आहे. विक्री व्यवसाय करताना विक्रीजन्य मालाचे तसेच वैयक्तिक स्वच्छते अनुषंगाने दक्षता घेणे आवश्यक असल्याने औषध व अन्न प्रशासन विभागाकडून तपासणी करून कार्यवाही करण्यात यावी. फळविक्रेता तसेच भाजीपाला विक्रेता यांना नगरपालिकेने ठरवून दिलेल्या जागी व्यवसाय करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
बाजारपेठेमध्ये ट्राफिकचा प्रश्न सोडवण्याकरिता सम विषम तारखेस वेगवेगळ्या बाजूला पार्किंगचे नियोजन नगरपालिका विभागाशी समन्वय साधून करण्यात येणार आहे. एकंदरीत सदरचा प्रकार अनावधानाने घडलेला असून कोणीही सोशल मिडीयावर जातीय किंवा धार्मीक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट टाकू नये. कोणत्याही धर्मा विषयी जाणीवपूर्वक द्वेष अथवा गैरसमज पसरवू नये. जातीय किंवा धार्मिक सलोखा बिगडेल असे कृत्य करू नये. विधानसभा निवडणूक पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचे मनाई आदेशाचा भंग करू नये. व्हाट्सअप ग्रुप ऍडमिन यांनी आक्षेपार्ह मेसेज किंवा पोस्ट तात्काळ डिलीट करून संबंधित व्यक्तींना याबद्दल समज द्यावी. अन्यथा सदर बाबत व्हाट्सअँप ग्रुप ऍडमिन यांना जबाबदार धरण्यात येईल. जो कोणी जातीय धार्मीक तेढ निर्माण करून कायदा व सुव्यवस्था भंग करणारी कृती करेल अशा व्यक्ति विरुध्द कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिला असून शांतता व सलोखा राखणे कामी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.