मालवणमधील “लो हॉल्टेज” ची समस्या सुटणार ; किनारपट्टीला फायदा 

भाजपा नेते निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ७ नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण किनारपट्टी वरील पर्यटन व्यावसायिक, मच्छिमारांची प्रमुख समस्या असलेला कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. भाजपा नेते निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून किनारपट्टीलगतच्या गावात पहिल्या टप्यात ७ ट्रान्सफॉर्मर मंजूर केले आहेत.

गेल्या अनेक वर्षापासून किनारपट्टीला ‘लो’ हॉल्टेजची समस्या आहे. हॉटेल-लॉजची वाढलेली संख्या, विजेवर आधारित पर्यटन व्यवसाय यामुळे किनारपट्टी नजीकच्या स्थानिक रहिवासी, मच्छिमार तसेच पर्यटन व्यवसायिक यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत होता. काही दिवसांपूर्वीच वायरी येथे पर्यटन व्यवसायिकांनी बैठक घेऊन आपली कैफियत निलेश राणे यांच्यासमोर मांडली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेतून किनारपट्टीलगतच्या गावांना ट्रान्सफॉर्मरसाठी निधी मिळावा अशी मागणी निलेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व खासदार नारायणराव राणे यांच्या जवळ केली होती. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून किनारपट्टीलगतच्या गावात पहिल्या टप्यात ७ ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आले आहेत. मालवण तालुक्यातील आचरा समर्थ नगर येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे, तारकर्ली नवीन दत्त मंदिर नजीक ट्रान्सफॉर्मर बसविणे, वायरी भूतनाथ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नजीक ट्रान्सफॉर्मर बसविणे, वायरी आचरेकर कंपाउंड येथे ट्रान्सफार्मर बसविणे, कुंभारमाठ गोवेकर दुकान येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे. घुमडे घूमडाइ मंदिर येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे, माऊली मंदिर चिंदर येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे. या कामांना पहिल्या टप्यात मंजुरी देण्यात आली आहे. 

किनारपट्टीनजीकच्या गावांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायणराव राणे, भाजपा नेते निलेश राणे यांचे भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत, मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर, मच्छिमार नेते दाजी सावजी, जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा सिंधुदुर्ग आशिष हडकर आदी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!