KOKAN MIRROR IMPACT : भोगवे तेरवळेवाडी बंधाऱ्याला आपत्कालीन निधी देण्याचे पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश 

माजी सभापती निलेश सामंत यांनी ना. रवींद्र चव्हाण यांची भेट घेत वेधले लक्ष

वेंगुर्ला (प्रतिनिधी) कर्लीखाडी आणि समुद्र संगमाच्या ठिकाणी वसलेल्या भोगवे तेरवळेवाडीला जोडणारी पायवाट सागरी अतिक्रमणामुळे लुप्त झाली आहे. त्यामुळे सागरी उधाणात येथील ग्रामस्थांची गैरसोय होत असून याबाबत कोकण मिरर डिजिटल न्यूजने लक्ष वेधल्यानंतर या कामाला गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दोन दिवसांपूर्वी माजी सभापती निलेश सामंत यांनी याठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर आज श्री. सामंत यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देत जिल्ह्याच्या आपत्कालीन निधी मधून या कामाला निधी देण्याची मागणी केली. याबाबत पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवत त्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबतची माहिती भाजपचे युवा कार्यकर्ते तुषार सामंत यांनी दिली.

भोगवे तेरवळेवाडी या वाडीची लोकसंख्या ५० च्या आसपास आहे. मात्र समुद्राच्या किनारून जाणारी येथील पायवाट खचली असून सागरी लाटांच्या तडाख्यामुळे ही पायवाट उधाणाच्या काळात लुप्त होते. त्यामुळे या वाडीचा गावाशी संपर्क तुटतो. सागरी उधाणात या पायवाटेवर तीन ते चार फुट पाणी येते. गावात लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक आहेत. त्यांनी यावेळी प्रवास कसा करायचा ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबतचे वृत्त कोकण मिरर वरून प्रसिद्ध होताच माजी सभापती निलेश यांनी येथे भेट देऊन पाहणी केली. येथे बंधाराकम रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. हा निधी लवकरात लवकर खर्च करण्यासाठी पालकमंत्री तसेच अधिकारी वर्गशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. याबाबत त्यांनी आज पालकमंत्र्यांची भेट घेऊन भोगवे तेरावळे सातेरी मंदिर जेटी ते तरीची जेठी येथील बंधारा वाहून गेल्यामुळे पायवट बंद झाल्याबाबतचे निवेदन त्यांना दिले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन निधीतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याबाबत पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी माजी सभापती निलेश सामंत, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर, शक्ती केंद्रप्रमुख सुनील चव्हाण, ग्रामस्थ रामा पाटकर, विश्वेश वायंगणकर उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!