देऊळवाडा स्मशानभूमीचे काम अर्धवट ; भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ
प्रशासनाचे लक्ष वेधुनही कंत्राटदाराचा हलगर्जीपणा ; युवासेना उपशहर अधिकारी उमेश चव्हाण यांची नाराजी
मालवण : शहरातील देऊळवाडा येथील स्मशानभूमीचे काम अपूर्ण स्थितीत असून यामुळे येथे येणाऱ्या मृतदेहांवर भरपावसात अंत्यसंस्कार करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नगरपरिषदेचे लक्ष वेधुनही त्यावर कार्यवाही झाली नाही. या कामाच्या कंत्राटाची मुदत संपूनही काम अपूर्ण असून कंत्राटदाराच्या कामगारांना याबाबत विचारणा केल्यास त्यांच्याकडून उद्धट उत्तरे दिली जात असल्याचा आरोप युवासेना उपशहर अधिकारी उमेश चव्हाण यांनी केला आहे. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष घालून हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे अशी मागणी श्री. चव्हाण यांनी केली आहे. श्री. चव्हाण यांनी या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी किरण चव्हाण, बाबू गावकर, संतोष चव्हाण, शेखर आंब्रडकर, प्रकाश माणगावकर, सत्यवान चव्हाण, राजू गावकर, संतोष चव्हाण, गणेश गावकर, पांडू फणसेकर आदी उपस्थित होते.