मोदी आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची ४.७८ कोटींची रक्कम सरकारने थकवली
आ. वैभव नाईक यांचा आरोप ; गणेशचतुर्थी पूर्वी लाभार्थ्यांना पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
मालवण : मोदी आवास घरकुल योजना सन २०२३-२४ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३०८ लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे. चार हप्त्यांमध्ये लाभार्थ्यांना घरासाठीची निर्धारित रक्कम दिली जाते. मात्र या लाभार्थ्यांना केवळ पहिल्या हप्त्याची रक्कम सरकारकडून देण्यात आली आहे. सरकारकडून उर्वरित तीन हप्त्याची रक्कम न मिळाल्याने लाभार्थ्यांनी व्याजाने पैसे घेऊन, कर्जे काढून अर्धवट असलेली घरे बांधून पूर्ण केली. तरी देखील सरकारने लाभार्थ्यांना दुसरा, तिसरा आणि चौथ्या हप्त्याची एकूण ४ कोटी ७८ लाख ४० हजार रु. रक्कम दिलेली नाही. शासनाच्या निधी प्रदान प्रणालीमध्ये निधी उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांच्या हक्काचे पैसे सरकारने थकीत ठेवले आहेत. एकीकडे सरकार निवडणुकीच्या तोंडावर नवीन योजना जाहीर करत आहे. आणि दुसरीकडे घरकुल योजनेचे पैसे थकविले जात आहेत. जिल्ह्यातील ६३३ लाभार्थ्यांच्या दुसऱ्या हप्त्याची २ कोटी ८४ लाख रु. प्रलंबित आहे. तसेच ३०८ लाभार्थ्यांच्या तिसऱ्या हप्त्याची १ कोटी २३ लाख रु. आणि ३४५ लाभार्थ्यांच्या चौथ्या हप्त्याची ६९ लाख रु रक्कम अशी सर्व मिळून ४ कोटी ७८ लाख ४० हजार रु. रक्कम सरकारने थकविलेली आहे. सरकारकडून लाभार्थ्यांवर झालेला हा अन्याय असून जर गणेश चतुर्थीपूर्वी लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या सर्व हप्त्यांचे पैसे मिळाले नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लाभार्थ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.