अनधिकृत मासेमारी विरोधात पुन्हा एकदा मोठा लढा उभारण्यास पारंपारिक मच्छिमार सज्ज
मालवणमधील पत्रकार परिषदेत इशारा ; मेघनाद धुरी यांचे “ते” वक्तव्य पारंपरिक मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळणारे
मालवण : एलईडी लाईट मासेमारीला परवानगी मिळावी, असे सिंधुदुर्ग जिल्हा मच्छिमार संस्था फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. अनधिकृत मासेमारी विरोधात गेले अनेक वर्षे ज्या मच्छिमारांनी लढा दिला, त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे हे वक्तव्य असून त्याचा आम्ही निषेध करतो. या वक्तव्यामुळे अनधिकृत मासेमारी विरोधात पुन्हा एकदा मोठा लढा उभारण्यास पारंपारिक मच्छिमार सज्ज आहेत, असा इशारा मालवण दांडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत पारंपारीक मच्छिमारांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधीनी दिला.
मालवण दांडी येथील श्रीकृष्ण मंदिरात पारंपारीक मच्छिमारांच्या प्रतिनिधिंची पत्रकार परिषद आज सायंकाळी झाली. यावेळी रविकिरण तोरसकर, दिलीप घारे, बाबी जोगी, मिथुन मालंडकर, सन्मेष परब, भाऊ मोर्जे, अक्षय रेवंडकर, हेमंत मोंडकर, रुपेश प्रभू आदी उपस्थित होते. यावेळी रविकिरण तोरसकर म्हणाले, एलईडी लाईट मच्छिमारीला केंद्र सरकारने बंदी घातलेली आहे. तरीही अनधिकृतपणे ही मच्छिमारी होत असून त्यामुळे पारंपारिक मच्छिमारांना अनेक समस्या भेडसावत आहेत, या मच्छिमारीमुळे समुद्रातील जैवविविधता धोक्यात येत आहे. अशा मच्छिमारीला परवानगी देण्याची मागणी मच्छिमार संस्था फेडरेशनचे अध्यक्ष असलेल्या मेघनाद धुरी व सहकाऱ्यांनी करणे चुकीचे आहे. या मागणी मागे धुरी यांचा वैयक्तिक स्वार्थ असल्याचा वास येत आहे. मत्स्य धोरण विषयक झालेल्या बैठकीतही किनारपट्टीवरील १२ आमदारांनी एलईडी मासेमारीला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे धुरी यांनी चुकीची वक्तव्ये करून मच्छिमारांमध्ये तेढ निर्माण करू नये, एलईडी मच्छिमारीला परवानगी मिळण्याबाबत कोणत्याही हालचाली सुरु झाल्यास त्यास तोंड देण्यास पारंपारिक मच्छिमार सक्षम आहेत, सरकार मधील कोणीही या मासेमारीचे समर्थन केल्यास त्यांनाही जागा दाखवून देण्याची ताकद आमच्यात आहे, असेही रविकिरण तोरसकर म्हणाले.
यावेळी बाबी जोगी म्हणाले, एलईडी मासेमारीला परवानगी मिळावी या मेघनाद धुरी यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. अनधिकृत मासेमारी विरोधात आजपर्यंत पारंपारिक मच्छिमारांनी जो लढा दिला त्यामुळेच मच्छिमारी कायद्यात बदल होऊन मच्छिमारांना न्याय मिळाला. यामध्ये मच्छिमार संस्था फेडरेशनचे कोणतेही योगदान नाही. पारंपारिक मच्छिमार व त्यांच्या संघटनानी दिलेल्या लढ्यामुळेच कायद्यात बदल झाल्याने पारंपारिक मच्छिमारांच्या मतांचा स्वीकार शासनाने करावा, अशी आमची मागणी आहे, असेही जोगी म्हणाले. यावेळी मिथुन मालंडकर म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात मासेमारी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते, त्यामुळे त्यास अनुसरून मत्स्य धोरण निश्चित करावे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पारंपारिक मच्छिमारी जास्त होत असून ती पुढे टिकण्यासाठी तसेच पारंपारिक मच्छिमार जगला पाहिजे, याचा विचार करून धोरण आखले पाहिजे, असेही मालंडकर म्हणाले.