मालवण शहरासाठी पूर्वीप्रमाणेच दोन पोलीस पाटील नियुक्ती करा
भाजपचे माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरात यापूर्वी दोन पोलीस पाटील कार्यरत होते. मात्र नियत वयोमनानुसार ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी एकही पोलीस पाटील नियुक्त केलेला नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांची गैरसोय होत असून मालवण शहरासाठी पूर्वीप्रमाणेच नव्याने दोन पोलीस पाटील नियुक्त करावेत, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक परशुराम उर्फ आप्पा लुडबे यांनी पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मालवण शहरात यापूर्वी दोन पोलीस पाटील नियुक्त होते परंतु वयोमानाप्रमाणे मागील दोन वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. त्यावेळेपासून मालवण शहरासाठी पोलीस पाटील नियुक्त केलेला नाही. मालवण शहरातील अर्ध्या भागासाठी पोलीस पाटीलचा चार्ज, हा मालवण पासून १० किलो मीटरवर राहत असलेल्या देवबाग गावच्या पोलीस पाटील जवळ दिलेला आहे. देवबाग, तारकर्ली, वायरी हा भाग सदर पोलीस पाटील यांच्याकडे चार्ज आहे त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण खूपच आहे.
मालवणच्या अर्ध्या भागाचा उर्वरीत चार्ज हा कुंभारमाठ पोलीस पाटील यांच्या जवळ दिलेला आहे. जे मालवण पासून चार किलोमीटरवर राहत आहेत व त्यांच्याजवळ त्यांच्या गावांचे काम आहेच. आणखी शहराचा चार्ज यामुळे कामाचा ताण वाढून त्यांची कामे वेळेवर होत नाहीत. त्यामुळे शासनाच्या नवनवीन योजनांचा लाभ घेताना लोकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. तरी शहरासाठी पूर्वीप्रमाणेच दोन पोलीस पाटील लवकरात लवकर नियुक्त करावेत, अशी मागणी श्री. लुडबे यांनी केली आहे.