“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुनील घाडीगांवकरांचा पुढाकार

भाजपाच्या माध्यमातून शिरवंडे गावातील पात्र महिलांची होणार मोफत नोंदणी ; आतापर्यंत १६२ महिलांची ऑनलाईन नोंदणी पूर्ण

मालवण | कुणाल मांजरेकर

राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये शासनाच्या वतीने दिले जाणार आहेत. या योजनेचा भाजपाच्या माध्यमातून शिरवंडे गावातील जास्तीत जास्त पात्र महिलांना लाभ होण्यासाठी माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. या योजनेच्या माहितीसाठी वाडीवाडीत बैठका घेत त्यांनी योजनेची माहिती पोहोचवली असून आतापर्यंत १६२ महिलांची ऑनलाईन नोंदणी ग्रामपंचायतीत पूर्ण झाली आहे. उर्वरित महिलांना देखील या योजनेचा लाभ दिला असून ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीचा आर्थिक भार स्वतः उचलण्याचा निर्णय सुनील घाडीगांवकर यांनी घेतला आहे.

राज्यातील महिलांना सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे, महिलांना सशक्तीकरणासाठी चालना देणे अश्या महिलांवर अवलंबित मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” आणली आहे. या योजनेसाठी महिलांनी ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना याचा लाभ होणार आहे.

या योजनेचा शिरवंडे गावातील जास्तीत जास्त महिलांना लाभ होण्यासाठी माजी पं. स. सभापती सुनील घाडीगांवकर यांनी पुढाकार घेतला आहे. भाजपाच्या माध्यमातून गावात वाडीनिहाय संघटनात्मक बैठका घेत त्यांनी महिलांना या योजनेचे महत्व आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यांची माहिती सादर केली. यावेळी सुनील घाडीगांवकर यांच्यासह भाजपचे बूथ अध्यक्ष संजय गावकर, सरपंच चैताली गावकर, उपसरपंच सुरेश गावकर, कैलास गावकर, विजय खांडेकर, सोनू गावकर, प्रकाश गावकर, सुभाष गावकर, विश्वनाथ गावकर, प्रभाकर गावकर, दिलीप भाट, रमेश बाणे, हनुमंत गावकर, माजी सरपंच संतोष लाड यांच्यासह भाजपाचे गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या सर्व महिलांना ग्रामपंचायतीत एकत्र करून त्यांचे ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात आले. जवळपास १६२ महिलांनी आतापर्यंत हे अर्ज सादर केले असून उर्वरित महिलांना देखील याचा लाभ देऊन या सर्वांचे ऑनलाईन अर्ज सबमिट केले जाणार आहेत. यासाठी आवश्यक असलेला आर्थिक भार सुनील घाडीगांवकर हे स्वतः उचलणार आहेत. या कामासाठी शिरवंडे ग्रामसेवक सचिन आनंद पवार, लिपिक चंद्रकांत विनायक गांवकर, शिपाई शेखर शरद गांवकर, डाटा ओपरेटर दिगंबर कालिदास गांवकर, अंगणवाडी सेविका सौ. गीता शंकर खानोलकर, सौ विद्या बाबू चव्हाण आदींचे सहकार्य लाभल्याची माहिती सुनील घाडीगांवकर यांनी दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!