भटकी जनावरे, शहर स्वच्छता, कोस्टल रोडसह विविध प्रश्न मार्गी लावावेत

भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी माजी खा. निलेश राणेंचे लक्ष वेधले

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहर तसेच किनारपट्टी भागातील स्वच्छता, शहरातील भटक्या जनावरांचा प्रश्न, किनारपट्टी वरील कोस्टल रोड यांसह तालुक्यातील विविध प्रश्नांवर भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख, माजी खा. निलेश राणे यांचे लक्ष वेधले आहे. 

मालवण शहर तसेच तालुक्यातील वेगवेगळ्या समस्यांबाबत काही महिन्यांपूर्वी निवेदनाद्वारे प्रशासनाला कळविले होते. परंतु अद्यापही त्यावर काही उपयोजना न झाल्याचे दिसून आले. मालवण शहरातील कचऱ्याचा प्रश्न अजून संपलेला नाही. त्यात भटके जनावर जसेकी कुत्रे, गुरे साचलेला कचरा अजून कचरा पसरवताना दिसत आहे. मालवण शहर हे पर्यटन दृष्ट्या विकसित होत असलेले शहर आहे. दर महिन्याला मालवण शहराला देश विदेशातील लाखो पर्यटक भेट देत असतात. मालवणचा निसर्ग, येथील समुद्र किनारे, येथील खाद्य पद्धती जगभरात प्रसिद्ध आहे. याची देखरेख करणे ही आपली जबाबदारी आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘नेव्ही डे’ दरम्यान मालवण शहरात स्वछता ठेवण्यात आली होती व आता मालवण शहरातील कचऱ्याची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर अली आहे. मालवण शहरात ठीकठिकाणी कचरा रस्त्यावर पसरलेला असतो. तर मालवण मच्छीमार्केट समोरील बाजूस कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते. याचे कारण म्हणजे परप्रांतीय भाजी विक्रेते व येथील हॉटेल व्यवसायिक. काही व्यापारी संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरी जात असताना राहिला कचरा मच्छी मार्केट समोरील हायमास्ट टॉवर खाली टाकून जात असतात. तर येथील हॉटेल व्यवसायिक रात्री उशिरा आपलं हॉटेल बंद करताना त्या हॉटेल मधील कचरा त्या ठिकाणी आणून टाकत असतात. त्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी देखील पसरत आहे. मालवण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत सकाळच्या वेळेस ती जागा स्वच्छ करण्यात येते. परंतु काही वेळानंतर परत त्या ठिकाणी घाण टाकली जाते. ते कचरा टाकणारे लोक कोण आहेत, ते परप्रांतीय व्यापारी आहेत का ? की येथील स्थानिक व्यापारी ? याकडे नागरपालिकेने लक्ष घालावा. या परिसरात सी. सी. टी. व्ही. कॅमेरा बसवण्यात यावा जेणेकरून त्या ठिकाणी जे कोण कचरा टाकत आहेत, ते यात दिसून येईल व प्रशासनाला कारवाई करण्यास मदत होईल.

१८ जानेवारी रोजी मालवण नगरपालिका कर्मचाऱ्यांतर्फे मच्छीमार्केट स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी मच्छि मार्केट व परिसरात डास प्रतिबंधक फवारणी करण्यात आली. परंतु त्या ठिकाणी काही तासात परत घाण टाकण्यात आली व त्या मोहिमेचा काही फायदा झाला नाही. जोपर्यंत मालवण बाजारपेठेत ठोस अशी उपायोजना करत नाही तोवर स्वच्छता मोहीम राबविण्याचा काही फायदा नाही. मालवण बंदर जेट्टी ते मच्छी मार्केट पर्यंत अनेक ठिकाणांवर रात्रीच्या वेळेस कचरा टाकला जातो. त्यामुळे या भागात डासांची संख्या देखील वाढली आहे. तरी मालवण नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी  या जागेची स्वतःहून पाहणी करावी. व या ठिकाणी उपयोजना राबवाव्यात. मालवण नगरपरिषदेमार्फत रात्रीची एक कचरा गाडी मालवण बाजारपेठेत फिरवावी, अशी मागणी सौरभ ताम्हणकर यांनी केली आहे.

४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण राजकोट येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यामुळे मालवण शहरात पर्यटकांचा ओढा अजून वाढला आहे. त्याचप्रमाणे मालवण बंदर जेट्टी ते मालवण दांडी येथील दांडेश्वर मंदिरापर्यंत कोस्टल रोड होणे गरजेचे आहे. जेणे करून मालवण बंदर जेट्टीवर आलेला पर्यटक कोस्टल रोडच्या सहाय्याने समुद्राच्या लाटांचे दर्शन घेत दांडेश्वर मंदिरापर्यंत जाऊ शकतो. त्याच प्रमाणे किनारपट्टी भागाला काही ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. ह्या मार्गामुळे किनारपट्टी भाग देखील स्वच्छ राहू शकतो. किनारपट्टी भागाचा मुख्य व्यवसाय म्हणजे मच्छिमारी. कोस्टल रोडमुळे मच्छिमारांना मोठ्या गाडीत मच्छी लीड करणे देखील सोपे होणार आहे. मालवण शहरातील दांडी परिसरात अतिदृष्टी वेळी किंवा समुद्राला उधाणाच्या वेळेस समुद्राचा पाणी वस्तीत येत असते. ह्या कोस्टल रोडमुळे हे देखील बऱ्या प्रमाणात कमी होईल. हा रस्ता अस्तित्वास आल्यास मालवण शहरात पर्यटनाच्या दृष्टीने चालना मिळणार आहे, असे सौरभ ताम्हणकर यांनी माजी खासदार निलेश राणे यांना पत्राद्वारे म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!