रत्नागिरीत ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात ; भाजपा नेते निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, रत्नागिरीचे आयोजन ; शिवरायांचा स्वराज्यासाठीचा संघर्ष पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी हे सोहळे महत्त्वाचे : निलेश राणे

रत्नागिरी : मुघलशाही, निजामशाहीचे तख्त नेस्तनाबूत करुन हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी मोठा उत्साहात रत्नागिरीत साजरा झाला. मारुती मंदिर येथील अश्वारूढ पुतळ्याजवळ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संघर्ष, लढाऊ वृत्ती यातूनच स्वराज्य स्थापन होते, याची शिकवण ३५१ वर्षांपूर्वी याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. हा इतिहास असाच पुढच्या पिढ्यांपर्यंत जाण्यासाठी असे सोहळे महत्वाचे असतात, असे प्रतिपादन निलेश राणे यांनी केले. 

यावेळी राजांच्या अश्वारूढ आणि सिंहासनाधिष्टीत मूर्तीला दुग्ध अभिषेक करून साखर, पेढे वाटून हा सोहळा साजरा झाला. निलेश राणे यांनी या सोहळ्यात सहभागी होत महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक केला. यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले,  महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे. तो अनेक पिढ्यांना कळावा, या इतिहासातून उत्तम ते आत्मसात करावं, महाराजांनी या स्वराज्यासाठी केलेल्या संघर्षाचे जाणीव ठेवावी यासाठी आजचा हा शिवराज्याभिषेकाचा सोहळा आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी महाराजांनी अनेक कष्ट हाल अपेक्षा सोसल्या आणि रयतेचं राज्य, स्वराज्य स्थापन केलं. त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला, कष्ट घ्यावे लागले. अनेक मावळ्यांनी या स्वराज्यासाठी बलिदान केलं तेव्हाच आज ३५१ वा शिवराज्याभिषेक सोहळा आपण साजरा करतोय. पण हा साजरा करण्यापुरता दिवस मर्यादित ठेवू नका. महाराजांनी स्वराज्य का स्थापन केलं हा विचार आपल्या मनातून जाता कामा नये, असे निलेश राणे म्हणाले. रत्नागिरीमध्ये शिवरायांचा कार्यक्रम असतो तेव्हा मोठ्या प्रमाणात तरुण पिढी बाहेर पडते, असे अनेक कार्यक्रम मी पाहिलेत आणि ही आनंदाची गोष्ट आहे, असेही निलेश राणे म्हणाले.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मिलिंद तगारे यानी श्री शिवछत्रपतिंच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले.आजच्या शिवराज्याभिषेक दिनाचे मानकरी श्री व सौ राणे दांपत्याच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मुर्तीची विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला. यावेळी हिंदुत्ववादी प्रेमी राकेश नलावडे, जयदीप साळवी, नंदू चव्हाण, कौस्तुभ सावंत, अमित काटे, अक्षत सावंत, निखिल सावंत, ऋषिकेश शिंदे, अमित नाईक, अमेय पाडावे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते, शिवप्रेमी उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3276

Leave a Reply

error: Content is protected !!