देवली वाघवणे खाडीपट्ट्यात वाळू लिलाव जाहीर नसतानाही दिवसाढवळ्या बेसुमार वाळू चोरी !
वाळू उत्खननामुळे खारबंधारा गेला खचून ; प्रशासनाने कारवाई न केल्यास ग्रामस्थ खाडीपात्रात उतरून करणार विरोध
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील देवली वाघवणे खाडीपट्ट्यात वाळू लिलाव जाहीर नसताना देखील बेसुमार वाळू चोरी सुरु आहे. या वाळू उत्खननामुळे येथील खारबंधारा खचून गेला असून लोकवस्ती, माड बागायती धोक्यात आली आहे. दिवसाढवळ्या सुरु असलेल्या या वाळू उत्खननाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून प्रशासनाने यावर कारवाई न केल्यास ग्रामस्थ स्वतः खाडीत उतरून या अनधिकृत वाळू उत्ख ननावर कारवाई करतील, यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा येथील ग्रामस्थांनी मालवण तहसीलदारांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, देवली वाघवणे कर्ली नदी येथील डी-५ या वाळूपट्ट्यामध्ये वाळू लिलाव जाहीर झालेले नाहीत. तरी सुद्धा या वाळूपट्ट्यामध्ये बेसुमार वाळू चोरी चालू आहे. या नदीवर १८०० मीटरचा खार बंधारा आहे. या खारबंधाऱ्याच्या आत माडबागायती, शेती तसेच लोकांची घरे आहेत. या वाळू उत्खननामुळे खारबंधारा खचून गेला आहे. त्यामुळे लोकवस्ती तसेच शेती, माडबागायती धोक्यात आली आहे. दिवसाढवळ्या सुरु असलेले हे अवैध वाळू उत्खनन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नजरेस का पडू नये असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी या अनधिकृत वाळू उत्खननावर ठोस कारवाई करुन ते कायमस्वरुपी बंद करावे, अन्यथा ग्रामस्थ स्वतः खाडीमध्ये उतरुन या अनधिकृत वाळू उत्खननास विरोध करतील हे करत असताना काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे. या निवेदनावर विरेश रावजी मांजरेकर, महेश प्रभाकर चव्हाण, प्रकाश भिवा मांजरेकर, रावजी सबणा मांजरेकर, हेमंत बापूजी चव्हाण, सौ. शोभा विजय आचरेकर, विजय दाजी आचरेकर, बापूजी महादेव चव्हाण, जगन्नाथ दत्तात्रय मांजरेकर, वैशाली विश्राम चव्हाण आदींच्या सह्या आहेत.