पर्यटन व्यावसायिकांची २८ मार्च रोजी मालवणात कार्यशाळा
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या निधी पोर्टलची माहिती देणार ; बाबा मोंडकर यांची माहिती
मालवण : केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील ५८ जिल्ह्याची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे. ही योजना स्वदेश 2.0 या नावाने कार्यान्वित करण्यात आली असून जिल्ह्यातील शाश्वत पर्यटनासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून नियोजन बद्ध सुरवात झाली आहे. या नुसार जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील हॉटेल, होम स्टे, ऍग्रो टुरिझम, रीसॉर्ट, रिक्षा व्यावसायिक, टुरिस्ट व्हेईकल व्यावसायिक क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी निधी पोर्टल रजिस्टर माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे मामा वरेरकर नाट्यगृह येथे पर्यटन व्यावसायिकांची दिनांक २८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये युनिट्सचे निवास सर्वेक्षण निधी पोर्टल नोंदणीसाठी तसेच कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम मार्गदर्शन करण्यात येणार असून यासाठी मंदार हाडके सिंधुदुर्ग येथील प्रकल्प समन्वयक,पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत स्वदेश दर्शन 2.0 हे उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायिकांना व्यवसाय वाढीसाठी मदत होणार असून पर्यटन व्यावसायिकांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन स्वदेश दर्शन समिती सदस्य तसेच पर्यटन व्यवसायिक महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आहे .