रस्त्यावर आडव्या आलेल्या गाईला धडकून मोटरसायकलस्वार गंभीर

मालवण कुंभारमाठ येथील दुर्घटना ; अधिक उपचारासाठी बांबुळीला हलवले

मालवण : दुचाकीने घरी जात असताना गाय आडवी आल्याने तिला धडक बसून झालेल्या अपघातात राजेंद्र ऊर्फ राजू भिवाजी चव्हाण (वय-५०, रा. आनंदव्हाळ) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात सायंकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान कुंभारमाठ येथे घडला. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजू चव्हाण हे सायंकाळी कुंभारमाठ येथे सुरू असलेले क्रिकेटचे सामने बघण्यासाठी थांबले होते. सामना बघितल्यानंतर ते आपल्या दुचाकीने आनंदव्हाळ येथे घरी परतत होते. याच दरम्यान फोंडेकर दवाखाना लगतच्या रस्त्यावर अचानक गाय आडवी आल्याने त्यांच्या दुचाकीची धडक बसून ते रस्त्यावर फेकले गेले. यात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्याचे दिसताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तात्काळ अधिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात जात अपघाताची माहिती घेतली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!