कुडाळ – मालवणातून निलेश राणेंना साथ द्या, शैक्षणिक गरजा सोडवण्यासाठी शासकीय निधीची वाट बघणार नाही….
भाजपा नेते दत्ता सामंत यांची ग्वाही ; आ. निरंजन डाव खरे यांच्या निधीतून ६ शाळांना संगणक प्रदान
मालवण | कुणाल मांजरेकर
२०१४ पूर्वी राणेसाहेबांनी जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक शाळांना स्वतःच्या खिशातून २५ -२५ लाखांचा निधी दिला. शिक्षक भरतीसह शिक्षकांच्या अडचणी सोडवल्या. पण त्यानंतर सत्तेत आलेल्या येथील स्थानिक आमदार, खासदारांनी शासनाचा स्मार्ट शाळांचा जी आर आल्यानंतर एकही शाळा स्वखर्चाने डिजिटल केली नाही. २०२४ हे वर्ष निवडणुकांचे आहे. कुडाळ मालवण मतदार संघातून निलेश राणे यांना यांना आमदार म्हणून निवडून द्या, मतदार संघातील शैक्षणिक गरजा सुधारण्यासाठी आम्ही शासनाच्या निधीची वाट पाहणार नाही. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी निलेश राणे आणी भाजपच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करू, अशी ग्वाही भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी येथे बोलताना दिली.
भाजप कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून कोकण पदवीधर मतदार संघांचे आमदार डॉ. निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतुन मालवण तालुक्यातील सहा शैक्षणिक संस्थाना संगणक प्रदान करण्यात आले. मालवण भाजप कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात न्यू इंग्लिश स्कुल आचरा, कै. देशभक्त शंकरराव गावाणकर सायन्स कॉलेज मालवण, डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कुल देवबाग, आर. पी. बागवे हायस्कुल मसुरे, वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा, शिवाजी विद्यामंदिर काळसे आदी शैक्षणिक संस्था प्रतिनिधी यांना हे संगणक प्रदान करण्यात आले. यावेळी दत्ता सामंत बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, बाबा मोंडकर, राजन गांवकर, आबा हडकर, महेश मांजरेकर, संतोष गांवकर, सौरभ ताम्हणकर, मंदार लुडबे, ललित चव्हाण, सूर्यकांत फणसेकर, रोहन सावंत, महिला पदाधिकारी पूजा वेरलकर, महानंदा खानोलकर, चारूशिला आचरेकर, महिमा मयेकर, कोचरेकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी दत्ता सामंत म्हणाले, आज सिंधुदुर्गचा निकाल १०० टक्के निकाल लागतो, त्याचे श्रेय केवळ राणेसाहेबांचे आहे. त्यांनी आजवर स्वखर्चाने जिल्ह्यातील शाळांना मदत केली. शिक्षकांचे प्रश्न सोडवले. मध्यंतरी शासनाचा स्मार्ट शाळा बनवा अशा जी आर आला. त्यावेळी स्थानिक आमदार, खासदार यांची जबाबदारी होती शाळा डिजिटलं करायची. पण स्थानिक खासदार, आमदार यांनी एकही शाळा स्वखर्चाने डिजिटलं केली नाही. पण मी राणेसाहेबांच्या माध्यमातून ४६ लाख खर्च करून २३ मराठी शाळा डिजिटल केल्या. आज आपण गावोगावी आणी वाडीवाडीत क्रिकेट स्पर्धा भरवतो. पण त्यातून काही निष्पन्न होत नाही. इथला एकही खेळाडू महाराष्ट्र किंवा देशात खेळताना दिसत नाही. हेच पैसे आपण शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी खर्च केले तर येथील गुणवत्ता अधिक वाढेल. अधिक चांगले विद्यार्थी आपल्या जिल्ह्यातून घडतील, असे ते म्हणाले. यावेळी कट्टा शाळेच्या शौचालयाचा प्रश्न निलेश राणे यांच्या माध्यमातून सोडवण्याची ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय केनवडेकर यांनी केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर तसेच उपस्थित मुख्याध्यापकांच्या वतीने वराडकर हायस्कुलचे मुख्याध्यापक संजय नाईक यांनी विचार मांडले.