महाविकास आघाडी कालावधीत आ. वैभव नाईकांनी मंजूर केलेल्या रस्त्यांचे निलेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन
युवासेना मालवण तालुकाप्रमुख मंदार गावडे, शिवसैनिक बिजेंद्र गावडे यांचीं माहिती ; आ. नाईक यांनी मंजूर केलेल्या कामांची भूमिपूजने करणे हेच निलेश राणेंचे कर्तृत्व असल्याची टीका
मालवण : मालवण तालुक्यातील चौके गावात काही दिवसापूर्वी भाजपचे नेते निलेश राणे यांनी भूमिपूजन केलेले रस्ते हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले आहेत. त्यामुळे वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकास कामांची भूमिपूजने करणे हेच निलेश राणे यांचे कर्तृत्व असल्याची टीका युवासेना मालवण तालुकाप्रमुख मंदार गावडे, शिवसैनिक बिजेंद्र गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी महाविकास आघाडीच्या काळात २०२१-२२ साली २५-१५ ग्रामविकास निधीतून चौके बावखोलवाडी जाणाऱ्या रस्त्यासाठी ५ लाख आणि चौके कुळकरवाडी जाणाऱ्या रस्त्यासाठी ५ लाख निधी मंजूर करून घेतला होता. याबाबतचा शासन निर्णय (शासन निर्णय क्र.विकास-२०२२/प्र.क्र. ५०/ योजना-६) दि. ३१ मार्च २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. मात्र त्याचदरम्यान सत्तांतर झाल्यांनतर शिंदे फडणवीस सरकारने या कामांना स्थगिती दिली होती. मात्र पक्षामार्फत आमदार वैभव नाईक मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने न्यायालयाने विकास कामांवरील स्थगिती उठविण्याचे सक्त आदेश सरकारला दिल्याने नाईलाजाने शिंदे फडणवीस सरकारने विकास कामांवरील स्थगिती उठविली आहे. मात्र निलेश राणेंचे कर्तृत्व शून्य असल्याने आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केलेल्या चौके गावातील विकास कामांची भूमिपूजने निलेश राणेंनी केली आहेत. केवळ श्रेय घेण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. चौके येथे करण्यात आलेली कामे ही ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांच्याकडे सुचविलेली कामे आहेत. केवळ ५ लाखाच्या निधीतुन ही कामे पूर्ण होणार नसल्याने ग्रामस्थांच्या मागणी वरून वैभव नाईक यांनी आपल्या आमदार फंडातून या दोन्ही कामांसाठी प्रत्येकी ५ लाख रु ज्यादाचा निधी मंजूर केला आहे. निलेश राणेंनी आपल्या पाच वर्षाच्या खासदारकीच्या कार्यकाळात मालवणात एकही विकास काम केले नाही. त्यामुळे अशा कर्तृत्व शून्य निलेश राणे यांना मालवणातील विकास कामांचे भूमिपूजन करण्याचा कोणताही अधिकार नाही, असे मंदार गावडे व बिजेंद्र गावडे यांनी म्हटले आहे.