सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरही पर्ससीनचा “रत्नागिरी पॅटर्न” आणण्याचा प्रयत्न !

आधीच स्थानिक आमदार, खासदारांचे दुर्लक्ष ; आता रत्नागिरीतील एका नेत्याकडून एलईडी फिशिंग मच्छिमारांना घेऊन जिल्ह्यात स्वतःची फौज तयार केली जातेय 

पारंपरिक मच्छिमार नेते छोटू सावजी यांचा आरोप ; सिंधुदुर्गातील पारंपरिक मच्छिमार गप्प बसणार नसल्याचा इशारा 

मालवण | कुणाल मांजरेकर

कोकण किनारपट्टीवरील प्रमुख व्यवसाय म्हणजे मासेमारी. मात्र गेली काही वर्षे कोकण किनारपट्टी वरील पारंपरिक मच्छिमारी कमी होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे रत्नागिरी, रायगडमध्ये वाढलेली मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर्सची मासेमारी आणि एलईडी फिशिंग. यामुळे येथील पारंपरिक मच्छिमारांचे मोठे नुकसान होत आहे. रत्नागिरी मधील काही राजकीय नेत्यांचे एलईडी फिशिंगमध्ये असलेले योगदान त्याठिकाणच्या पारंपरिक मासेमारीला घातक ठरत आहे. सिंधुदुर्गात आजही काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने मासेमारी सुरु असताना दुर्दैवाने रत्नागिरी मधील एका नेत्याकडून सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर पर्ससीनचा “रत्नागिरी पॅटर्न” आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी रत्नागिरी येथील नेते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपली फौज तयार करताना दिसत आहे. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर रत्नागिरी पॅटर्न करण्याचा प्रयत्न झाल्यास पारंपरिक मच्छिमार गप्प बसणार नाही, असा इशारा पारंपरिक मच्छिमार नेते छोटू सावजी यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे दिला आहे.

याबाबत श्री. सावजी यांनी म्हटले आहे की, कोकणी माणूस हा निसर्गावर अवलंबून आहे. गेल्या अनेक वर्षापासून कोकण किनारपट्टीवर मच्छिमार पारंपरिक पद्धतीने मासेमारी करत आहेत. परंतु गेली काही वर्ष कोकण किनारपट्टीवर पारंपरिक मासेमारी कमी होत झाल्याचे दिसत आहेत. कोकण किनारपट्टीवरील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मलपी येथील हायस्पीड मासेमारी व एलईडी फिशिंगद्वारे मासेमारी केली जात आहे. त्यामुळे येथील पारंपरिक मच्छिमार यांना मोठे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक मच्छिमार हा नेहमीच संघर्ष करत आला आहे. नैसर्गिकरित्या समुद्री वादळ असो, मलपी हायस्पीड मासेमारी असो किंवा एलईडी मासेमारी असो अशा विविध समस्यांनी पारंपरिक मच्छिमार हा त्रस्त राहिलेला आहे, असे छोटू सावजी यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!