परशुराम उपरकर यांच्यासोबतच राहणार ; विनोद सांडव यांच्यासह कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया
१८ फेब्रुवारीला कुडाळमध्ये उपरकर समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा ; उपरकर घेतील त्या निर्णयाशी ठाम राहण्याची भूमिका जाहीर
मालवण | कुणाल मांजरेकर
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी मनसे पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर कुडाळ येथे १८ फेब्रुवारीला होणाऱ्या मेळाव्यातून ते पुढील राजकीय दिशा ठरवणार आहेत. परशुराम उपरकर जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही सर्व कार्यकर्ते ठाम राहू, अशी भूमिका मनसेचे माजी तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी स्पष्ट केली आहे.
परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वात आम्ही अनेक वर्षे काम करत आहोत. संघटनेसाठी व कार्यकर्त्यांसाठी तन मन धन अर्पण करत उपरकर नेहमीच कार्यरत राहिले. कार्यकर्त्याला बळ देणे, त्याच्या सोबत राहणे. हे कार्य करत असताना पारदर्शक पद्धतीने जिल्ह्यात विकास झाला पाहिजे ही त्यांची भूमिका राहिली. आगामी काळात कार्यकर्ते यांच्या बाजूने विचार करत तसेच जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ते जो राजकीय निर्णय घेतील त्यासोबत मालवण तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते सोबत आहेत. कुडाळ येथे १८ रोजी होणाऱ्या मेळाव्यात मालवण तालुक्यातून शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते जाणार आहेत, अशी माहिती विनोद सांडव यांनी दिली.