“होऊदेच चर्चा….”
मालवणच्या भरड नाक्यावर भाजपा युवा मोर्चाने लावलेला फलक ठरतोय लक्षवेधी !
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपा सरकारच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात सर्वत्र ” होऊ दे चर्चा” अभियान राबवले जात आहे. यामध्ये भाजपा सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मालवणात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने “होऊदेच चर्चा” हा बॅनर लावण्यात आला आहे. यामध्ये मालवण बस स्थानकाच्या रखडलेल्या नूतनीकरणावरून आमदार वैभव नाईक यांना “लक्ष्य” करण्यात आले आहे. हा बॅनर मालवणात चर्चेचा विषय ठरला आहे.
आमदार वैभव नाईक यांच्या आमदारकीच्या मागील टर्म मध्ये मालवण बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र वैभव नाईक यांची आमदारकीची दुसरी टर्म संपत आली तरी हे काम अद्यापही अपूर्ण असून याच कामावरून भाजपा युवा मोर्चाने मालवणच्या भरड नाक्यावर फलक लावून आ. नाईक यांच्यावर टीका केली आहे.
“आमदार कसला ? हा तर बोलघेवड्या. आता जनताच म्हणेल याला तू चल निघ” ,”मल्टीप्लेक्स थिएटर दुसऱ्या मजल्यावर होणार होते, त्याचे काय झाले ?”, “मालवण शहरातील बस स्थानक एक वर्षात पूर्ण होणार असे जनतेला गाजर दाखवले… आता पहिली टर्म संपून दुसरी टर्म संपत आली तरी…”, अशा टिप्पण्या करत मालवण मधील उ.बा.ठा. सेनेचा आमदार वैभव नाईकांच्या अपयशी कारभारावर ” होऊदेच चर्चा” असा फलक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीने लावण्यात आला आहे.