आ. वैभव नाईक अडचणीत ; अनधिकृतपणे एसटी बस चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

भाजपाच्या शिष्टमंडळाचे कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदन ; एसटीच्या अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी

कुडाळ : एसटी महामंडळाच्या ताफ्यात विनावातानुकुलीत शयनयान एसटी बस दाखल झाल्या आहेत. कुडाळ येथून सुटणाऱ्या एसटीच्या शयनयान बसचे उदघाटन करताना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी ही बसचे सारथ्य केल्याचे समोर आले होते. यावरून आता वैभव नाईक अडचणीत येण्याची शक्यता आहे. एसटी बस चालवण्याचा परवाना नसताना प्रवाशी असलेली बस चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी आ. नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने कुडाळ पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी भाजपाचे ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बंड्या सावंत, जिल्हा चिटणीस विनायक राणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिपक नारकर, मोहन सावंत, निलेश तेंडुलकर, नित्यानंद कांदळगावकर, पप्पा तवटे, भाजयुमो अध्यक्ष रूपेश कानडे, आनंद शिरवलकर, माजी नगरसेवक सुनिल बांदेकर, सरचिटणीस राजेश प्रभु, शक्तिकेंद्र प्रमुख नागेश परब, ऋणाल कुंभार, नागेश आईर, प्रकाश पावसकर उपस्थित होते. यानिवेदनात म्हटले आहे की, सोशल मीडिया आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून हाती आलेल्या प्रत्यक्ष पुरावे आणि व्हिडिओच्या अनुषंगाने कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ विभागाच्या बांदा-कुडाळ-बोरीवली या शयनयान प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या चालकाच्या जागेवर बसून राज्य परिवहन मंडळाच्या मालकीची बस चालवल्याचे निदर्शनास आलेले आहे. कुडाळ आगाराच्या बांदा बोरीवली बसचे लोकार्पण करण्याच्या अतिउत्साहात आमदार वैभव नाईक यांनी वाहन चालवण्याचे सर्व नियम धाब्यावर बसवले आहेत.

कुडाळ बस स्थानकात बांदा बोरिवली ही प्रवाशांनी भरून आलेली MH14KQ7930 ही एसटी बस स्वतःकडे प्रवासी वाहतुकीचा कोणताही अधिकृत परवाना नसताना भरधाव वेगाने चालवण्याची चित्रफीत प्रसिद्ध झाली असून त्यांच्या या कृत्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका उत्पन्न झाला होता. तसेच सदर बस चालवत असताना चालक केबिनमध्ये काही कर्मचारी आणि इतर प्रवासी उभे असल्याचे दिसत आहे. या प्रसंगी या एसटी बसचा प्रवासी चढण्याचा दरवाजा देखील उघडा ठेवण्यात आला होता. सदरच्या बसेस चालवण्यासाठी कुडाळ तसेच इतर आगारातील चालकांना योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच नवीन प्रकारच्या बसेस चालवण्याचे कौशल्य व प्रशिक्षण त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा प्रवाशी बस चालवण्यासाठी आवश्यक परवाना(लायसन्स) नसताना आमदार वैभव नाईक यांनी हे बेकायदेशीर कृत्य करून प्रवाशांना जीवाला धोका उत्पन्न केला आहे. सदरची बाब अतिशय गंभीर असून प्रवासी यांच्या जीवितास हानी पोहोचवणारी असून सरकारी मालमत्तेला हानी पोचवणारे आहे. त्यामुळे कुडाळ आगाराची एसटी बस चालवल्याप्रकरणी आमदार वैभव नाईक आणि त्यांना बस चालवण्यासाठी परवानगी देणारे एसटी सिंधुदुर्ग विभागाचे विभाग नियंत्रक अभिजित पाटील व विभागीय वाहतूक अधिकारी डॉ.विक्रम देशमुख व इतर अधिकारी यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3590

Leave a Reply

error: Content is protected !!