अधिकारी, कर्मचारी “इव्हेन्ट”मध्ये व्यस्त ; पालिका कार्यालय पडले “ओस” !
मालवणमधील प्रकार ; राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकारी बाळू अंधारी यांनी व्यक्त केली नाराजी
मालवण | कुणाल मांजरेकर
शासनाच्या “माझा देश, माझी माती” अभियानासाठी मालवण नगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी ओरोसला गेल्याने पालिका कार्यालय ओस पडल्याचे दृश्य शुक्रवारी मालवणात दिसून आले. यामुळे विविध कामासाठी पालिकेत आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. राष्ट्रीय काँग्रेसचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
येथील पालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी पालिकेत उपस्थित नसल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. पालिकेत आपल्या कामासाठी आलेले राष्ट्रीय काँग्रेसचे बाळू अंधारी यांनाही अधिकारी व कर्मचारी दिसून न आल्याने त्यांनी उपस्थित मोजक्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता सर्व स्टाफ माझा देश माझी माती उपक्रमासाठी ओरोस येथे गेल्याचे सांगण्यात आले. कोणतीही पूर्वकल्पना न देता अथवा सूचना फलक न लावता एकाच वेळी सर्वच स्टाफ पालिकेत उपस्थित नसेल तर नागरिकांची कामे होणार कशी ? असा प्रश्न अंधारी यांनी उपस्थित करत संताप व्यक्त केला. नगरपालिकेचा कारभार, शहरातील स्वच्छता आणि विकासकामे यांच्या नावाने बोंबाबोंब असताना नगरपालिका केवळ इव्हेंट साजरे करण्याचे काम करत आहे, मुख्याधिकाऱ्यांनी महिनाभर नगरपालिका बंद ठेवून इव्हेंटच साजरे करावे, अशी टीका यावेळी अंधारी यांनी केली. येथील परिस्थिती पाहताच श्री. अंधारी यांनी पत्रकारांना पाचारण करून पालिकेतील वस्तुस्थिती दाखवत एक प्रकारे पालिकेच्या कारभाराचा पंचनामा मांडला. पालिकेच्या बांधकाम विभागाच्या दालनात फक्त दोन कंत्राटी कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसले. इतर सर्व खुर्च्या रिकामी होत्या. तसेच तळमजल्यातील कार्यालयात एक कंत्राटी कर्मचारी, एक शिपाई व टपाल स्वीकारणारी कर्मचारी एवढेच मोजके कर्मचारी दिसून आल्याचे अंधारी यांनी सांगितले. आज नगरपालिकेत कोणीही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नाहीत. नगरपालिकेच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेबाबत कोणताही फलक येथे लावलेला नाही. अचानक कोणीही अधिकारी, कर्मचारी नसल्याने येणाऱ्या नागरिकांना माघारी फिरावे लागत आहे. आधीच नगरपालिकेत अपुरा कर्मचारी वर्ग आहे, असे असताना एकाच वेळी सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांची आज मोठी गैरसोय झाली आहे. सर्व स्टाफ ओरोस येथे गेला असून त्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना शहरवासियांना देण्यात आलेली नाही किंवा तशा आशयाचा माहिती फलकही येथे लावलेला नाही. नगरपालिकेचे मुख्याधिकारीही कधी नगरपालिकेत उपस्थित नसतात, यामुळे अनेक कामे रखडली आहेत. नगरपालिका प्रशासनाकडून भोंगळ कारभार सुरु आहे असे त्यांनी सांगितले.
नगरपालिकेकडे पुरेसे स्वच्छता कर्मचारी नाहीत. कचरा व्यवस्थापनासाठी नेमलेले ठेकेदार पळून जातात, पळून गेलेल्या ठेकेदारांना त्यांची डिपॉझिट रक्कमही नगरपालिकेकडून दिली जाते असा आरोप बाळू अंधारी यांनी केला. नवीन आणलेल्या कचरा वाहक गाड्या विनावापर केवळ दिखाव्यासाठी उभ्या करून ठेवलेल्या आहेत. कचरा गाड्यांसाठी चालक नाहीत. शहरात कचऱ्याचे साम्राज्य असून स्वच्छतेच्या नावाने बोंब आहे. मालवण हे गलिच्छ शहर बनले आहे. स्वच्छतेसाठी नेमलेले स्वच्छता दूत केवळ नगरपालिकेने असे केले, तसे केले सांगत फुशारक्या मारत आहेत. नगरपालिका कार्यालयही केवळ बाहेरून सुशोभीकरण व स्वच्छता करण्यात आली असून नगरपालिका कार्यालयाच्या आत मोठ्या प्रमाणावर कचरा आणि भंगार साहित्य पडलेले आहे, तो देखील स्वच्छतादुतांनी एकदा येऊन पहावा. ज्या नगरपालिकेचे स्वतःचे पोट साफ नाही ते शहर स्वच्छ काय करणार ? असा टोलाही अंधारी यांनी लगावला.
येथील पालिका आणि मुख्याधिकारी हे केवळ केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानाचे इव्हेंट करण्याचे काम करत आहे. लोकांच्या जीवावर स्वच्छता मोहिमा घेतल्या जात आहेत. शहरात स्वच्छता, विकासकामे यांच्या नावाने बोंबाबोंब आहे. मुख्याधिकाऱ्यांनी महिनाभर नगरपालिका बंद ठेवून केवळ इव्हेंटच साजरे करावेत, अशी टीका श्री. अंधारी यांनी केली.