राजकीय दृष्ट्या संवेदनशील सिंधुदुर्ग जिल्हा पुन्हा तापला ; भाजपा – ठाकरे गटाचे कार्यकर्ते “आमने – सामने” !

मोदींवरील टीकेनंतर ठाकरे गटाच्या सभेत भाजपा कार्यकर्ते आक्रमक” ; दोन्हीकडील कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावले…

मालवण तालुक्यातील पोईप गावातील घटना ; “भाषण नको, चर्चा करा” भाजपा कार्यकर्त्यांचा आग्रह

भाषण अर्धवट टाकून वैभव नाईकांची भाजपा कार्यकर्त्यांच्या दिशेने कूच ; भाजपा कार्यकर्तेही शिंगावर घेण्याच्या तयारीत ; मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा संघर्ष टळला

मालवण | कुणाल मांजरेकर

राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण बुधवारी पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने “होऊ द्या चर्चा” या बॅनरखाली सिंधुदुर्गात कॉर्नर सभांचे आयोजन केले आहे. बुधवारी दुपारी मालवण तालुक्यातील पोईप गावात ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते गुरुनाथ खोत यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र ही सभा सुरू होताच शेकडोंच्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले. आम्हाला सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी व्हायचे आहे, असा आग्रह भाजपा कार्यकर्त्यांनी धरल्याने येथे मोठा गोंधळ निर्माण झाला. दोन्ही बाजूंकडून सुरू झालेल्या घोषणाबाजी मूळे येथील वातावरण तणावपूर्ण बनले. आमदार वैभव नाईक भाषणाला उभे राहताच भाजपा कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाल्याने वैभव नाईक यांना भाषण अर्धवट टाकून स्टेज खाली उतरावे लागले. आमदार नाईक शिवसैनिकांसमवेत भाजपा कार्यकर्त्यांच्या अंगावर जाण्याच्या तयारीत असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना शिंगावर घेण्याची तयारी केल्याने मोठा राडा होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र अपुरी पोलीस कुमक असतानाही पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी सतर्कता दाखवत दोन्ही बाजूकडील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवरल्याने मोठा संघर्ष टळला आहे. या सभेनंतर मालवण शहरात देखील ठाकरे गटाच्या वतीने फोवकांडा पिंपळावर “होऊ दे चर्चा” हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या ठिकाणी प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मात्र ही सभा शांततेत संपन्न झाल्याने पोलीस प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर आहे. भाजपा सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सिंधुदुर्गात नाक्या नाक्यांवर “होऊ द्या चर्चा” या कॉर्नर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी दुपारी मालवण तालुक्यातील पोईप नाक्यावर ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते गुरुनाथ खोत, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख पंकज वर्दम, युवासेनेचे उपतालुकाप्रमुख अमित भोगले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

विरण बाजारपेठेत भाजपा कार्यकर्त्यांची जमवाजमव, सभेस्थळी कूच !

पोईप नाक्यावर ठाकरे गटाची कॉर्नर सभा होणार असतानाच येथून काही मीटर अंतरावर असलेल्या विरण बाजारपेठेत भाजपा कार्यकर्त्यांची जमावाजमव सुरु झाली. याची माहिती मिळताच ठाकरे गटाने देखील आपली गर्दी वाढवण्यास सुरुवात केली. याची कुणकुण पोलिसांना लागताच पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने येथे धाव घेतली. ठाकरे गटाची सभा सुरु होताच भाजपा कार्यकर्ते याठिकाणी दाखल झाले. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी या सर्वांना रोखून धरले असता ठाकरे गटाने जनतेला चर्चेसाठी बोलावले असल्याने आम्ही चर्चा करण्यासाठी येथे आलो असल्याचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, माजी सभापती अनिल कांदळकर, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, राजेंद्र प्रभुदेसाई, महेश मांजरेकर, संतोष गावकर, दीपक सुर्वे, छोटू ठाकूर, दया देसाई, राकेश सावंत, गौरव लुडबे, दादा नाईक यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सभास्थळी गोंधळ ; प्रश्न विचारण्यावर भाजपा पदाधिकारी ठाम

भाजपचे कार्यकर्ते येथे दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी त्यांना माघारी फिरण्याची सूचना केली. मात्र ठाकरे गटाने लोकांना चर्चेसाठी निमंत्रित केले असल्याने आम्ही देखील या चर्चेत सहभाग घेणार असल्याची ठाम भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली. ठाकरे गट जनतेला चर्चेसाठी निमंत्रित करून पळ काढत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा सरकारवर टिका सुरु होताच भाजपा कार्यकर्ते आक्रमक बनले. यावेळी दोन्ही बाजूंकडून घोषणाबाजी सुरु झाली. ठाकरे गटाचे नेते मोदींवर टीका करत असताना भाजपा कार्यकर्त्यांनी “मोदी मोदी” अशी घोषणाबाजी सुरु केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाकडून देखील “फेकू फेकू” अशी घोषणा सुरु केली. यावेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरु होता. या गोंधळातच ठाकरे गटाच्या नेत्यांनी आपली भाषणे केली.

भाषण अर्धवट टाकून वैभव नाईक भाजपाच्या दिशेने …

आमदार वैभव नाईक भाषणाला उभे राहताच भाजपा कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी सुरु केली. आम्हाला चर्चा करायची आहे, असा आग्रह त्यांनी धरल्याने आ. नाईक यांनी मी पळ काढणारा आमदार नाही, तुमच्याशी चर्चा करणारच असे सांगितले. यानंतर देखील गोंधळ सुरूच असल्याने आ. नाईक यांनी समोर येऊन बोलण्याचे आव्हान भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले. हे आव्हान मिळताच भाजपा कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी सभेत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी जोर लावत त्यांना मागे नेले. याचवेळी आमदार वैभव नाईक आक्रमक झाले आणि भाषण थांबवून ते खाली उतरले. यावेळी कार्यकर्त्यांसह ते भाजपा कार्यकर्त्यांच्या गराड्यात घुसण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याना देखील मागे लोटले. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा संघर्ष टळला. सुमारे एक ते दीड तास हा वाद सुरु होता. यानंतर मालवणच्या सभेवेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!