मालवण किनारपट्टी नजिकच्या समुद्रात पर्ससीन नौकांची घुसखोरी …
तातडीने गस्तीनौका उपलब्ध न झाल्यास पारंपरिक मच्छिमार पितृपक्षात शासनाच्या नावाने पिंडदान करणार : मच्छीमार नेते बाबी जोगी यांचा इशारा
मालवण | कुणाल मांजरेकर
पावसाळ्याच्या बंदी कालावधी नंतर मत्स्यहंगाम सुरु झाला आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच समुद्रात बांगडा मोठ्या प्रमाणात मिळू लागला असून हा मासा लुटण्यासाठी मालवण किनारपट्टी नजिकच्या समुद्रात नौकांची नौकांची घुसखोरी सुरु झाली आहे. मात्र त्यांना रोखण्यासाठी अद्यापही शासनाने गस्तीनौका उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे धनदांडग्या पर्ससीन धारकांना शासनाने समुद्र आंदण दिलाय का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तातडीने शासनाने गस्तीनौका उपलब्ध करून न दिल्यास येत्या पितृपक्षात शासनाच्या नावाने पारंपरिक मच्छिमार पिंडदान करतील, असा इशारा मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी दिला आहे.
मासेमारी हंगाम नव्याने सुरु झाला आहे. मात्र शासनाने मच्छीमारांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. समुद्रकिनारी पर्ससीन मार्फत मच्छीमारीची लूट सुरु आहे. शासनाचे कायदे धाब्यावर बसून ही मासेमारी सुरु असून सिंधुदुर्ग फिशरीजला देण्यात येणारी गस्तीनौका अद्याप देण्यात आली नाही. त्यामुळे हे सरकार गरीब व पारंपारिक मच्छीमार यांची रोजीरोटी वाचवू शकत नाही का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या विरोधात संघर्ष छेडण्याचा निर्णय पारंपरिक मच्छिमारांनी घेतला आहे.