सुदेश आचरेकर हे भाजपाच्या दत्ता सामंत योजनेतील “लाभार्थी” !

ठाकरे गट तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा पलटवार ; आमचा नाद करू नका नाहीतर तंबू सकट बांबू उखडून टाकू…

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवणात भाजपा विरुद्ध शिवसेना ठाकरे गट पदाधिकारी यांच्यात शाब्दिक वार पलटवार सुरूच आहेत. ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी भाजपा नेते दत्ता सामंत यांच्यावर केलेल्या टिकेला माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी टिका केल्यानंतर खोबरेकर यांनी आचरेकर यांच्यावर पलटवार केला आहे. सुदेश आचरेकर हे भाजपाच्या दत्ता सामंत योजनेतील “लाभार्थी” आहेत. निवडणूक होईपर्यंत ते भाजपा नेत्यांना “हम साथ साथ है” ची भूमिका दाखवतात. तर निवडणुका होताच “हम आपके है कौन ?” या भूमिकेत असतात. दत्ता सामंत यांच्या नादाला लागू नका, असा सल्ला ते आम्हाला देत आहेत. मात्र त्यांनीच आमचा नाद करू नये. अन्यथा आगामी पालिका निवडणुकीत तुमचा तंबूसह बांबू देखील उखडून टाकू, असा इशारा हरी खोबरेकर यांनी दिला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी गुरुवारी शिवसेना शाखेत ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, युवा सेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, मंदार केणी, महेश जावकर, उमेश चव्हाण, उमेश मांजरेकर, नरेश चव्हाण, सन्मेष परब, दीपा शिंदे, निनाक्षी शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, सुदेश आचरेकर यांना दत्ता सामंत यांना कोणी बोलल्यावर लगेच राग येतो, वेदना होतात. दत्ता सामंत यांचे गोडवे गाताना निलेश राणे यांची पाठीमागून निंदा नालस्ती करण्याचे काम ते करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजपा महासागर आहे, हे आम्हाला पण मान्य आहे. २०१४, २०१९ मध्ये आमच्या सारख्या निष्ठावंत शिवसैनिक आणि भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी भाजपाला महासागर बनवण्याचे काम केले. पण नद्या नाल्यामध्ये जसा पाला पाचोळा वाहून येतो, तसे आचरेकर आणि त्यांचे नेते भाजपात आल्यामुळे हा महासागर दूषित झाला आहे, असे सांगून आचरेकर यांची संस्कृती मालवणच्या जनतेला चांगलीच माहित आहे. निवडणुकीत राजा गावकर यांना मारहाण असो अथवा पोलीस उपनिरीक्षकांना धक्काबुक्की वेळी घडलेला प्रकार सर्वांनी अनुभवला आहे. त्यामुळे सुदेश आचरेकर यांनी आपला भूतकाळ तपासावा, मागील सात – आठ वर्ष नगराध्यक्ष पदापासून दूर असल्याने आलेल्या नैराश्येतून ते काहीही बरळत आहेत, असा टोला हरी खोबरेकर यांनी लगावला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!