२०१४, २०१९ प्रमाणे २०२४ मध्येही शिवसैनिक दत्ता सामंतांच्या मनातील भ्रमाची हंडी फोडून भगवा गुलाल उधळतील !

ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा इशारा ; निलेश राणेंच्या विरोधात दत्ता सामंतांची पडद्यामागून षडयंत्रे सुरु असल्याचा गंभीर आरोप

जगातील सर्वात मोठ्या पक्षाकडे कार्यकर्ते नसल्याने शिवसैनिकांच्या दारावर जाऊन भाजपात प्रवेशासाठी प्रयत्न

मालवण | कुणाल मांजरेकर

कुडाळ- मालवण मतदार संघात गणेश चतुर्थी पूर्वी १० – १२ जणांचे प्रवेश घेऊन आमदार वैभव नाईक यांच्या गडाला सुरुंग लावण्याचे स्वप्न भाजपचे नेते दत्ता सामंत पाहत आहेत. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी दत्ता सामंत मोठमोठ्या पदावर असताना निष्ठावंत शिवसैनिकांनी त्यांच्या मनातील भ्रमाची हंडी फोडून भगवा गुलाल उधळला होता. त्याप्रमाणेच २०२४ मध्येही शिवसैनिकच पुन्हा एकदा भगवा गुलाल उधळतील, ही बाळासाहेेब ठाकरेंची शिवसेना आहे. इकडे घागरी घडवण्याचे काम होते, त्या घागरीना कोणता आकार द्यायचा ते शिवसैनिक ठरवतात, असेही त्यांनी म्हटले आहे. एकीकडे निलेश राणे यांना कुडाळ मालवण मधून आमदार करायचे आहे असे सांगून पडद्याआड निलेश राणे कसे वाईट आहेत, हे लोकांमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न दत्ता सामंत यांच्याकडून सुरु असल्याचा गंभीर आरोप यावेळी हरी खोबरेकर यांनी केला.

भाजपाचे नेते दत्ता सामंत यांनी शुक्रवारी भाजपा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली होती. ठाकरे शिवसेनेच्या घागरीवर दगड बसला असून आता त्यातून किती पाणी गळेल, हे सांगणे कठीण असल्याचे त्यांनी म्हटले होते. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यावर केलेल्या टीकेचा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, महेश जावकर, गणेश कुडाळकर, महेंद्र म्हाडगुत, प्रसाद आडवणकर, उमेश मांजरेकर, उमेश चव्हाण, निनाक्षी शिंदे, सन्मेश परब, नरेश हुले, हेमंत मोंडकर, दीपा शिंदे, वैभव खोबरेकर, चंदू खोबरेकर, किरण खडपे, अक्षय रेवंडकर, गौरव वेर्लेकर आदी उपस्थित होते. यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, निवडणुका आल्यावरच दत्ता सामंत यांची पोपटपंची सुरू होते. जिल्ह्यातील काही मंडळींचे लक्ष वेधण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात. त्यांच्या पक्षाकडे सक्षम कार्यकर्ते नसल्याने शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना भेटून भाजपा प्रवेशासाठी गळ घातली जात आहे, हे भाजपाचे अपयश असल्याचे स्पष्ट होते. एकीकडे भाजपा महासागर आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे स्वतःकडे सक्षम कार्यकर्ते नसल्याचे मान्य करायचे. असले प्रकार सध्या या ठिकाणी सुरू असल्याचे हरी खोबरेकर म्हणाले. जिल्ह्यात ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना भेटून भाजपात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा बँकेचे थकबाकीदार असलेल्यांवर दडपण आणले जात असून काहींना जिल्हा बँकेमार्फत कर्ज प्रकरण करून देण्याचे आमिष दाखवले जात आहे. ठाकरे गटाच्या काही सरपंचांकडे देखील असे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जोपर्यंत राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता आणून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावर बसवत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार ठाकरे गटाच्या सरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आमदार वैभव नाईक यांनी आजपर्यंत त्यांना दिलेली प्रत्येक आश्वासने पूर्ण केली आहेत, असेही हरी खोबरेकर म्हणाले.

गॅस सिलेंडर, इंधन, खतांचे सवलतीच्या दरात वाटप करा…

आज महागाईचा आगडोंब प्रचंड उसळला आहे. इंधन, गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले असून शेतीची अवजारे, खते मोठ्या प्रमाणात महागली आहेत. त्यामुळे या जीवनावश्यक वस्तूंचे दर ५० % कमी करून भाजपा त्या सवलतीच्या दरात वाटणार काय ? असा सवाल करून भाजपने असे उपक्रम राबवले तर शिवसेना ठाकरे गट खुल्या मनाने त्याचे स्वागत करेल, असे हरी खोबरेकर म्हणाले.

दत्ता सामंत यांची रोजीरोटी वैभव नाईकांनी आणलेल्या पैशातून…

दत्ता सामंत हे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करत आहेत. मात्र आज आमदारांनी आणलेल्या पैशाच्या जीवावरच दत्ता सामंत यांची रोजीरोटी सुरू आहे, हे त्यांनी विसरून चालणार नाही. आमदार नाईक यांनी राज्य शासनाकडून मंजूर आणलेल्या अनेक रस्त्यांची टेंडरे दत्ता सामंत यांच्याकडेच आहेत, असा टोला हरी खोबरेकर यांनी लगावला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3585

Leave a Reply

error: Content is protected !!