सिंधुदुर्ग बँकेमार्फत विभागीय सहनिबंधक आप्पाराव घोलकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

आप्पाराव घोलकर यांनी निवृत्तीनंतर सहकारातच कार्यरत रहावे : जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचे प्रतिपादन

सिंधुनगरी : अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारे अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे कोकण विभागाचे विभागीय सह निबंधक आप्पाराव घोलकर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर आम्ही सहकारात काम करणारे सर्वजण प्रभावित झालो आहोत. अशा अधिकाऱ्यांच्या निवृत्तीनंतर, त्यांच्या ३३ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतील अनुभवाचा उपयोग महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला व्हावा आणि म्हणूनच निवृत्तीनंतर पुढच्या काळामध्ये त्यांनी सहकार क्षेत्रामध्येच कार्यरत रहावे. सहकारी संस्था आणि शेतकरी यांच्या आर्थिक विकासासाठी जिल्हा बँक काम करत असताना आपल्यासारख्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन या पुढील काळात निश्चितपणे लाभो अशी अपेक्षा जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व्यक्त केली.

कोकण विभागाचे विभागीय सह निबंधक आप्पाराव घोलकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या सत्कार समारंभात मनिष दळवी बोलत होते. या सत्कार समारंभाला उत्तर देताना आप्पाराव घोलकर म्हणाले की, शासकीय सेवेमध्ये वरिष्ठ पदावर काम करीत असताना प्रामाणिकपणे, अभ्यासू वृत्ती ठेवून काम केले, तर त्या कामाचे निश्चितपणे समाधान मिळते आणि या आत्मिक समाधानाचे मोल निश्चितपणे फार मोठे असते. कायद्याच्या तरतुदी, शासन निर्णय, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना व नियमात केलेल्या कामाची अम्मल बजावणी अधिक प्रभावीपणे करता येते. आणि असं काम करत असताना त्याचे बारकावे समजतात असेही ते पुढे म्हणाले.

सुरुवातीला बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी प्रास्तविक केले. तर जिल्हा बॅकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक गजानन गावडे यांनी आपल्या मनोगतात आप्पाराव घोलकर यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपविभागीय निबंधक श्री. देशपांडे, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक अजय थुटे, जिल्हा उपनिबंधक सांगळे, सहा. निबंधक श्री.धुळप, जिल्हा लेखा परिक्षक शेणगांवकर तसेच बँकेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी तसेच सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी बँके व सहकार क्षेत्रातील विविध संस्थाच्या वतीने घोलकर यांना पुष्पगुच्छ देउन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!