अदानीचे १२ हजार कोटी माफ केलात, त्याच धर्तीवर मच्छीमारांच्या एनसीडीसीच्या बोटींचे कर्ज माफ करा…
मच्छीमार नेते बाबी जोगी यांची केंद्र सरकारकडे मागणी ; अदानीला एक तर हजारो मच्छीमारांना दुसरा न्याय नको
केंद्र सरकार मधील कोकणचे नेते स्थानिक मच्छीमारांचे कर्ज माफ होण्यासाठी आवाज उठवणार काय ?
मालवण | कुणाल मांजरेकर
केंद्र सरकारने अदानी समूहाचे तब्बल १२ हजार कोटींचे कर्ज माफ केले आहे. याच धर्तीवर मच्छिमारांनी एनसीडीसीच्या योजनेतून घेतलेले बोट बांधणीचे कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी पारंपरिक मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी केली आहे. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एनसीडीसी मच्छिमारांचे थकीत कर्ज ४३ कोटी ४१ लाख आहे. हा व्यवसाय आज तोट्यात असून अनेक मच्छिमार हा व्यवसाय बंद करून दुसऱ्या व्यवसायाकडे वळले आहेत. अदानी हे गुजरातचे आहेत, म्हणून त्यांचे कर्ज माफ होत असेल तर कोकणातील केंद्र सरकार मधील नेते स्थानिक मच्छिमारांचे कर्ज माफ होण्यासाठी आवाज उठवणार का ? असा सवाल श्री. जोगी यांनी केला आहे.
याबाबत श्री. जोगी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ज्याप्रमाणे अदानी समूहाचे बारा हजार कोटी माफ करण्यात आले, त्याचप्रमाणे मच्छीमारांचे कर्ज माफ करण्यात यावे. एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एनसीडीसी मच्छिमार थकीत कर्ज ४३ कोटी ४१ लाख एवढे शिल्लक आहे. फिशिंग बोट हा व्यवसाय सध्या तोट्यात असून हा व्यवसाय बऱ्याच मच्छीमाऱ्यांनी बंद करून ते छोट्या पारंपारिक मच्छीमार व्यवसायाकडे वळले आहेत. ते आत्ता कर्जफेड करू शकत नाही व कर्जापायी त्यांचे कुटुंब मुला बाळांच्या भविष्याच्या चिंतेने चिंताग्रस्त आहेत. आपल्या कर्जाची वसुली मुलाबाळांकडून होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. एका बोटीच्या बांधणी करता सात जणांचा ग्रुप करण्यात आला होता. त्यातील बहुतांश बोटी त्यांची लाईफ संपून त्या नष्ट झाल्या आहेत. त्यामुळे अदानींना एक न्याय व हजारो मच्छीमाऱ्यांना न्याय का नाही ? हा भेदभाव केंद्र सरकार कशासाठी करत आहे ? कर्ज माफ व्हावे ही मागणी कित्येक वर्षापासून मच्छीमार संस्था, मच्छीमार करत आहेत. अदानी हे गुजरातचे आहेत म्हणूनच त्यांचे कर्ज माफी मिळाली का ? मग कोकणातील केंद्र सरकारमधील नेते यासाठी आवाज उठवतील का ? आता केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार या दोन्ही ठिकाणी भाजप सत्तेत सहभागी आहे. मग अदानी प्रमाणेच मच्छीमारांचे कर्ज माफीसाठी प्रयत्न करतील का ?की अदानी गुजराती आहेत म्हणून डोळे झाक करतील ? असा सवाल बाबी जोगी यांनी केला आहे.