मालवण शहरातील कचरा जमा करण्यासाठी दोन दिवसात मिनी कचरा गाड्या दाखल होणार

भाजपाचे युवा नेतृत्व सौरभ ताम्हणकर यांनी वेधले होते नगरपालिकेचे लक्ष ; श्री. ताम्हणकर यांनी मानले मुख्याधिकाऱ्यांचे आभार

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरात कचऱ्याची वाढती समस्या आणि गल्लो-गल्लीतील कचरा उचल करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कचरा उचल करण्याच्यादृष्टीने मिनी कचरा गाड्या मालवण नगरपालिकेने उपलब्ध कराव्यात अशी मागणी मालवण मधील भाजपचे युवा कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी मालवण नगरपालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे केली होती. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेकडून घंटागाड्यासाठी निविदा काढण्यात आली असून येत्या दोन दिवसात ठेका पद्धतीने मालवण शहरात पाच मिनी कचरा गाड्या दाखल होत आहेत. याबद्दल श्री. ताम्हणकर यांनी प्रशासक व मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

मालवण नगरपालिकेकडे मिनी कचरा गाड्या नसल्याने गल्लोगल्लीतील कचरा उचल करण्यात मोठी समस्या निर्माण झाली असून त्यामुळे अनेक ठिकाणी कचरा साठून राहत आहे. यासाठी नगरपालिकेने मिनी कचरा गाड्या उपलब्ध कराव्यात अशी मागणी सौरभ ताम्हणकर यांनी मालवण नगरपालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे केली होती.

मालवण शहरात नगरपालिकेकडून कचरा उचल होत असताना यात कचरा गाड्यांची कमतरता दिसून येते. मोठ्या कचरा वाहक गाड्यांबरोबरच घराघरात व छोट्या गल्ली बोळातील कचरा उचल करण्यासाठी आवश्यक छोट्या कचरा गाड्या यांच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी कचरा उचल होत नाही. यामुळे कचरा साचून दुर्गंधी होत आहे. या समस्येबाबत सौरभ ताम्हणकर यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे लक्ष वेधत छोट्या कचरा गाड्या उपलब्ध कराव्यात अशी मागणी केली. यावेळी अधिकारी निखिल नाईक यांच्यासह निशय पालेकर, राकेश सावंत, फ्रान्सिस फर्नांडिस ,चंद्रकांत मयेकर आदी उपस्थित होते.

सौरभ ताम्हणकर यांच्या या मागणी नंतर नगरपालिकेने मिनी कचरा गाड्या ठेका पद्धतीने उपलब्ध केल्या गेल्याने लेखी निवेदन न देताही समस्या लक्षात आणून दिल्यावर मुख्याधिकाऱ्यांनी कचरा गाडीप्रश्नी तात्काळ कार्यवाही केल्याने सौरभ ताम्हणकर यांनी मुख्याधिकारी श्री. जिरगे यांचे आभार मानले आहेत. या गाड्या उपलब्ध झाल्यावर मालवण शहरातील कचरा समस्या दूर होण्यास मदत होईल, असेही ताम्हणकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!