भाजपा नेते निलेश राणेंकडून मालवणात सफाई कामगारांना रेनकोटचे वाटप
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा दिनानिमित्त उपक्रम
मालवण | कुणाल मांजरेकर
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा दिना निमित्त भाजपा मालवणच्या वतीने मालवण कुडाळ विधानसभा संयोजक निलेश राणे यांच्या संयोगाने मालवण शहरातील ५० सफाई कामगाराना पावसाळ्यासाठी आवश्यक असणाऱ्या रेनकोटचे वाटप करण्यात आले. सोमवारी भाजपा कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस गोरगरीब जनतेची सेवा करून करावा असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. याला अनुसरून हे रेनकोट वाटप करण्यात आले. ठेकेदार ठेक्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे वेतन देत नसल्याबाबत भाजपा नेते निलेश राणे तसेच मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठेकेदार आणि कामगार यांची संयुक्त मिटिंग लावून यासंदर्भात तोडगा काढण्यात येईल, असे वचन सर्व कामगारांना भाजपा तर्फे देण्यात आले. लवकरच भाजपातर्फे सर्व सफाई कामगारांची आरोग्य तपासणी व स्किन स्पेशालिस्ट कडून करून घेण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास भाजपा शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, बाबा परब, दीपक पाटकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, सौ. पूजा करलकर, ललित चव्हाण, आबा हडकर, हरेश गावकर, कमलेश कोचरेकर, भाई मांजरेकर, मोहन वराडकर, मंदार लुडबे, विक्रांत नाईक आदी उपस्थित होते.