आपत्कालीन संकटात वायरी भूतनाथ ग्रा. पं. ची तत्परता …

नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तातडीने मासिक सभा बोलावत गावातील चार कुटुंबाना प्रत्येकी २,५०० रु. मदतीचे वाटप

नैसर्गिक आपत्तीमुळे गावात २१ जणांचे नुकसान ; शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : सरपंच भगवान लुडबे यांची माहिती

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी पडझड होऊन नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढवले आहे. या संकटात मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीची तत्परता पाहायला मिळाली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर या ग्रा. पं. ने शुक्रवारी तातडीची मासिक सभा बोलावून गावातील चार आपदग्रस्तांना प्राथमिक मदत म्हणून आपल्या ग्रा. पं. निधीतून प्रत्येकी २,५०० रुपयांची मदत सुपूर्द केली. पावसामुळे गावातील २१ कुटुंबांचे नुकसान झाले असून या सर्वांना शासन स्तरावरून मदत मिळवून देण्यासाठी महसूल प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती सरपंच भगवान लुडबे यांनी दिली.

या नुकसानग्रस्तांमध्ये रजनी हरिश्चंद्र परब (लुडबेवाडी), कृष्णा शांताराम गोसावी ( मोरेश्वरवाडी), सुरेखा भरत मयेकर ( भूतनाथवाडी) आणि हेमंत गोविंद तोंडवळकर (लुडबेवाडी) यांचा समावेश आहे. सरपंच भगवान लुडबे, उपसरपंच प्राची माणगांवकर यांच्यासह अन्य ग्रा. पं. सदस्यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. यावेळी ग्रा. पं. सदस्य संजय लुडबे, प्रतीक्षा केळूसकर, तेजस लुडबे, चंदना प्रभू, गौरी जोशी, ममता तळगावकर, पांडुरंग मायनाक, विकास मसुरकर, ग्रामसेवक सुनील चव्हाण, तलाठी वसंत राठोड यांच्यासह दत्ताराम मालवणकर, मंजिरी लोकेगावकर, प्रवीण लुडबे, प्रगती लुडबे, निहारिका मयेकर, जयप्रकाश बोडवे, दाजी जोशी तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

सरपंचांकडून गावात पाहणी

दोन दिवसांपूर्वी गावात मुसळधार पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. यावेळी
वायरी भूतनाथ गावातील लुडबेवाडी, वराडकरवाडी, बोडवेवाडी, भूतनाथवाडी, तेली पाणंद, भालेकर पाणंद, जाधववाडी या वाडींची सरपंच भगवान लुडबे यांनी पाहणी केली. गावातील ज्या ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे, त्यांनी व सदस्यांनी ग्रामपंचायतमध्ये येऊन कळविणे. संबंधितांच्या घरी येऊन पंचनामे केले जातील, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!