मालवण | खालची देवलीत वस्तीलगत आढळली भली मोठी मगर ; ग्रामस्थांमध्ये घबराट
चार तासांच्या अथक परिश्रमानंतर पाण्याबाहेर काढण्यात यश
मालवण : तालुक्यातील खालची देवली येथील सायाबन पुलाखालील पाण्यात आज सकाळी स्थानिक ग्रामस्थांना सुमारे साडे पाच फूट लांबीची मगर दिसून आली. वस्तीलगत आलेल्या मगरीमुळे परिसरात घबराट पसरली होती. या घटनेची माहिती वनविभागास दिल्यानंतर वन विभाग, कोकण वाईल्डलाईफ रेस्क्यू फोरमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नांनंतर त्या मगरीला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.
खालची देवली येथे सायाबन येथे हल्लीच नव्या पुलाचे काम करण्यात आले आहे. आज सकाळी या पुलावरून जाणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना पुलाखालील पाण्यात मगर असल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती गावातील अन्य ग्रामस्थांना दिल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानुसार वनपाल अनिल राठोड, वनरक्षक संजीव जाधव, वन कर्मचारी अनिल परब, राहुल मयेकर हे घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती मिळताच कोकण वाईल्डलाईफ फोरमचे अध्यक्ष अनिल गावडे, संजयकुमार कुपकर, शुभम फाटक, दर्शन वेंगुर्लेकर, धर्माजी तांडेल, वैभव खोबरेकर, वैभव आंबरुसकर यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे तसेच महसूलचे कर्मचारी आपल्या पथकासह दाखल झाले होते.
खालची देवली येथे मगर आढळली असल्याची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थ, शाळकरी मुलांनी परिसरात मोठी गर्दी केली होती. पाण्याच्या मध्यभागात थांबलेली मगर बराच वेळ हलत नसल्याने तिला पकडण्याचे मोठे आव्हान वन विभाग आणि रेस्क्यू टीमसमोर होते. मगर पाण्यातून बाहेर पडून दुसरीकडे जाऊ नये यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुलाच्या मुखाकडील भागास जाळे लावले. पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने पोलीस निरीक्षकांनी कोणालाही मगरीपासून धोका पोहचू नये यासाठी त्यांना घटनास्थळावरून दूर केले. मगरीला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. अखेर चार तासांच्या प्रयत्नांनंतर रेस्क्यू टीमला या साडे पाच फूट लांबीच्या मगरीला पाण्यातून बाहेर काढण्यात यश मिळाले. पकडण्यात आलेली मगर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आली असून तिला सुरक्षित ठिकाणी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.