… तोपर्यंत वीज कार्यालयाला ठोकलेले टाळे काढणार नाही ; देवबाग ग्रामस्थांची भूमिका
महावितरणचे कार्यकारी अभियंता मालवणात दाखल ; मात्र ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम
कार्यकारी अभियंत्यांनी देवबागात येऊन चर्चा करावी – ग्रामस्थांची भूमिका ; तर अगोदर कार्यालयाचे टाळे उघडा, नंतर चर्चेसाठी येण्याचे अधिकाऱ्यांकडून मान्य
मालवण | कुणाल मांजरेकर
देवबाग गावातील विजेच्या प्रश्नाबाबत येथील ग्रामस्थांनी वीज वितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले आहे. कार्यालयाला कुलूप लावून ग्रामस्थ येथून निघून गेले आहेत. दरम्यान, वीज वितरणचे कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब पाटील हे मालवणात दाखल झाले आहेत. त्यांनी ग्रामस्थांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी गावात येण्याची सूचना ग्रामस्थांनी केली आहे. मात्र कार्यालयाला ठोकलेले टाळे अगोदर उघडा, नंतर तुमच्या सोबतच गावात चर्चेसाठी येतो, असा प्रस्ताव वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. मात्र अगोदर आमचे प्रश्न सोडवा आणि नंतरच कार्यालयाला ठोकलेले टाळे उघडू, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, वीज वितरण कार्यालया बाहेर सायंकाळ पर्यंत पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला असून या पेचावर कोणता तोडगा निघणार ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
पर्यटन गाव असलेल्या देवबाग गावात मागील ७० दिवस विजेची समस्या गंभीर बनली आहे. मात्र याकडे वीज वितरणचे दुर्लक्ष होत असल्याने आक्रमक ग्रामस्थांनी मंगळवारी येथील वीज कार्यलयाला धडक दिली. मात्र ग्रामस्थांनी पूर्वकल्पना देऊनही वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थ आक्रमक बनले. ग्रामस्थ येणार असल्याचे माहित असूनही अधिकाऱ्यांनी कार्यालयातून पळ काढल्याचा आरोप करीत जोपर्यंत अधिकारी दाखल होत नाहीत, तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही. आणि अधिकारी दाखल होईपर्यंत कार्यालयाचे कामकाज देखील बंद ठेवा, अशी आक्रमक भूमिका सरपंच उल्हास तांडेल आणि ग्रामस्थांनी घेतली. मात्र बराच वेळ अधिकारी दाखल न झाल्याने ग्रामस्थांनी वीज वितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले आहे.
सहाय्यक अभियंता दाखल होताच ग्रामस्थ आक्रमक ; महिलांचा रुद्रावतार
काहीवेळाने सहायक अभियंता साखरे हे येथे दाखल होताच ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी साखरे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु केला. यावेळी महिला वर्ग कमालीचा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. गावातील विजेच्या समस्या तात्काळ सुटल्या पाहिजेत. त्यासाठी आवश्यक असलेली सामुग्री तात्काळ मागवा. अन्यथा कार्यालयाला घातलेले टाळे काढणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. यावेळी श्री. साखरे यांनी कार्यकारी अभियंता मोहिते यांना दूरध्वनीवर संपर्क साधला असता श्री. मोहिते यांनी येथे येऊन आमचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी ग्रामस्थानी केली. यानंतर ग्रामस्थ येथून निघून गेले. यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन वीज वितरणच्या अधिकाऱ्याकडून आम्हाला नाहक मनस्ताप झाल्याने अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, असे पत्र ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात दिले आहे.
कार्यकारी अभियंता मालवणात ; ग्रामस्थांशी चर्चेची तयारी
देवबाग ग्रामस्थांनी कार्यालयाला टाळे ठोकल्याच्या पार्श्वभूमीवर वीज वितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते मालवणात दाखल झाले आहेत. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चेची तयारी दाखवली आहे. मात्र अगोदर कार्यालयाचे टाळे उघडा. कर्मचाऱ्यांना आतमध्ये बसू द्या. नंतर आपण ग्रामस्थांसह चर्चेला येतो, असे श्री. मोहिते यांनी सांगितले. मात्र गावातील समस्या मार्गी निघेपर्यंत टाळे खोलणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.