कसाल नजिक दुचाकीचा अपघात ; सर्जेकोटच्या युवकाचा मृत्यू
मालवण : कसाल वरून कणकवलीच्या दिशेने येत असलेल्या दुचाकीचा कसाल नदी वरील तीव्र वळणावर अपघात झाला. या अपघातात मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथील केतन खडपकर या २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. तर कुडाळ मधील एक जण गंभीर जखमी आहे. कणकवलीतील एकाला किरकोळ दुखापत झाली असल्याचे समजते. हा अपघात आज मध्यरात्री २.३० च्या सुमारास झाला. या दुर्घटनेमुळे सर्जेकोट गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार नदीवरील तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने अपघात झाला असल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्गावर जाणाऱ्या प्रवाशांनी जखमींना मदत केली तसेच पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवत जखमींना जिल्हा रुग्णालय ओरोस येथे दाखल केले. मात्र केतन याचा मृत्यू झाला आहे. दुपारी त्याचा मृतदेह गावात आणण्यात आला. यावेळी उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली.