दांडी चौकचार मंदिर ते मोरयाचा धोंडा किनारपट्टीवर धूपप्रतिबंधक बंधारा उभारावा !

दांडी येथील नागरिकांची ना. नारायण राणे यांच्याकडे मागणी ; राणेंकडून सकारात्मक प्रतिसाद

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरातील दांडी समुद्रकिनारी श्री देव चौकचार मंदिर ते ऐतिहासिक मोरयाचा धोंडा देवस्थान पर्यंतचा सुमारे २ ते ३ कि.मी. लांबीच्या धूप प्रतिबंधक बंधारा कम रस्त्याचे काम मार्गी लावावे अशी मागणी दांडी येथील नागरिकांनी सोमवारी केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नारायण राणे यांनी सदर बंधारा कम रस्ता करून देण्याचे आश्वासन देत त्याबाबत पतन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सूचना दिल्या.

मालवण दौऱ्यावर आलेल्या केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची चिवला बीच येथील त्यांच्या निलरत्न निवासस्थानी दांडी येथील नागरिकांनी भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी दांडी गाव अध्यक्ष निलेश कांदळगावकर, नारायण धुरी, संदीप मालंडकर, घनश्याम जोशी, वायरीचे माजी सरपंच भाई ढोके, योगेश पराडकर, कमलेश कोचरेकर, सुधांशु मालंडकर, भूषण धुरी, संचित तारी, सुनील धुरी, लीलाधर धुरी, मंगेश धुरी, निखिल पराडकर, रुपेश धुरी, बाबू कुबल, दत्तात्रय धुरी यांसह भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, बाबा परब, ललित चव्हाण, मोहन वराडकर व इतर उपस्थित होते.

यापूर्वी ना. नारायण राणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना दांडी समुद्रकिनारी श्री देव दांडेश्वर श्रीकृष्ण मंदिर पर्यंत बंधारा कम रस्ता मार्गी लागलेला आहे. त्यानंतर अनेक वेळा दांडी गाव कमिटीमार्फत अनेक वेळा निवेदन सादर केली. परंतु त्याची दखल घेतली नाही. या बंधारा कम रस्त्यामुळे किनारपट्टीचे संरक्षण झाले आहे. शिवाय वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा ठरला आहे. मासेमारी व पर्यटन या दोन्ही व्यवसायासाठी हा बंधाराकम रस्ता अतिशय लाभ लाभदायक ठरला आहे. मागील काही वर्षात देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची संख्या वाढली आहे. तौक्ते आणि क्यार सारख्या चक्रीवादळाचा किनारा किनारपट्टीला मोठा फटका बसला आहे. तरी दांडी येथील शेकडो पारंपरिक मच्छीमारांच्या वसाहतीला संरक्षण देण्यासाठी हा बंधारा बांधण्यात यावा. याठिकाणी सध्या मंजूर असलेला बंधारा हा केवळ दगडी बंधारा असून त्याला रस्त्याची जोड नाही. केवळ दगडी बंधारा उपयोगाचा नसून मासेमारी व पर्यटन या यादृष्टीने बंधारा कम रस्ता महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे श्रीदेव चौककर श्रीकृष्ण मंदिर ते ऐतिहासिक मोरयाचा धोंडा देवस्थान पर्यंतचा बंधारा कम रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी दांडी ग्रामस्थांनी नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीवर नारायण राणे यांनी सदर बंधारा काम रस्ता करून देण्याचे आश्वासन देत त्याबाबत पतन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सूचना दिल्या. तसेच केंद्रीय अर्थसंकल्पात मच्छिमारांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून येथील मच्छिमारांना केंद्रीय योजनाचा लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात लवकरच मच्छिमार मेळावा आयोजित करू तसेच मच्छिमारांसाठी कोल्ड स्टोरेज व्यवस्था उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही यावेळी ना. राणे यांनी दिले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!