मालवणात भल्या पहाटे अग्नीतांडव ; दोन दुकाने जळून खाक
सुमारे ८ ते १० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरातील धुरीवाडा येथे भल्या पहाटे आगीचे तांडव पाहायला मिळाले. धुरीवाडा बोर्डिंग ग्राऊंड परिसरात दोन दुकानांना आग लागून ही दुकाने जळून खाक झाली. या दुकानात कपडे, शिलाई मशीन आणि अन्य साहित्याचा समावेश होता. या आगीत सुमारे ८ ते १० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.
धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड परिसरात विलास परुळेकर यांच्या मालकीची दोन दुकाने आहेत. या मधील एका दुकानात ते शिलाई मशीन विक्री आणि दुरुस्तीचा व्यवसाय करतात. येथील १२ ते १५ मशीन तसेच फर्निचर व संपूर्ण दुकान जळाले. तर बाजूला असलेले मृणाल मोंडकर यांचे लेडीज टेलर व शिवणक्लास हेही दुकान जळाले. यातील मशीन साहित्य व ग्राहकांचे कपडे जळून खाक झाले. काही ग्राहकांचे लग्नाचे कपडेही दुकानात होते. त्याचेही नुकसान झाले. या परिसरात मॉर्निंग वॉक साठी जाणाऱ्या काही नागरिकांच्या दृष्टिक्षेपास ही घटना पडल्यानंतर त्यांनी स्थानिक नागरिकांना याबाबत कल्पना दिली. यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पालिकेच्या अग्निशमन बंबाला आणून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ही दोन्ही दुकाने जळून खाक झाली. सुदैवाने नजिकचे हेमू लाड यांचे जेन्टस पार्लर चे दुकान बचावले आहे. आग विझवण्यासाठी नितीन धुरी, संतोष धुरी यांच्यासह माजी नगरसेवक मंदार केणी, राजू बिड्ये, महेश सारंग, दिलीप हडकर, विलास परुळेकर, चारुशीला आढाव, विजय चव्हाण, दादा वाघ, अरुण धुरी, भाई कासवकर यांच्यासह अन्य नागरिकांनी प्रयत्न केले. नायब तहसीलदार कोकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.