शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मालवणात सेवादालन साकारावे !
माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी व्यक्त केली अपेक्षा ; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार
मालवण शिवसेना शाखेत बाळासाहेबांची जयंती साजरी ; युवा- ज्येष्ठानी व्यक्त केल्या बाळासाहेबांप्रति भावना ; मंदार ओरसकर यांच्या भाषणाचं कौतुक
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी युवा पदाधिकाऱ्यांबरोबतच ज्येष्ठानी बाळासाहेबांच्या प्रति आपल्या भावना व्यक्त केल्या. मालवण मध्ये बॅ. नाथ पै यांच्या नावे सेवांगणची वास्तू कार्यरत आहे. त्याच धर्तीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे सेवादालन उभारावे. येथून सामाजिक कार्य अखंडितपणे सुरु ठेवावे, अशी संकल्पना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी मांडली. यासाठी आपण स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, आज आमच्या बाळासाहेबांना चोरण्यासाठी अनेक जण टपले आहेत. त्यांच्या नावाने महाराष्ट्र जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आपण सर्वजण शिवसेना पक्षाचे “ऑफिशियल” कार्यकर्ते आहोत. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक काम करूया, असं युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर यांनी म्हटलं. त्यांच्या छोटेखानी भाषणाचं उपस्थितांनी कौतुक केलं. युवा कार्यकर्त्यांना आज बाळासाहेब समजले हेच मोठं यश आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठानी व्यक्त केली.
शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मालवण येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालयात सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक उपक्रमही या निमित्ताने राबविण्यात आले. यावेळी जेष्ठ शिवसैनिक माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, बाबा सावंत, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख यशवंत गावकर, संमेश परब, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, महेंद्र म्हाडगुत, मनोज लुडबे, मनोज मोंडकर, वासुदेव गांवकर, नरेश हुले, उमेश मांजरेकर, प्रसाद आडवणकर, संजय साळकर, हरिश्चंद्र हुरणेकर, गिरीश कांबळी, चंदू खोबरेकर, सचिन गिरकर, दत्ता पोईपकर, महिला आघाडी तालुकाप्रमुख दीपा शिंदे व श्वेता सावंत, तालुका समन्वयक पूनम चव्हाण, शहर संघटक रश्मी परुळेकर, उपशहर प्रमुख नंदा सारंग, कुडाळ मालवण युवती सेना प्रमुख शिल्पा खोत, मालवण युवती सेना प्रमुख निनाक्षी शिंदे, अंजना सामंत, माजी नगरसेविका नीना मुंबरकर, तृप्ती मयेकर, महिला शाखा प्रमुख साक्षी मयेकर, आर्या गावकर, शांती तोंडवळकर, मंदा जोशी यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाई गोवेकर यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. मालवणची शाखा १९७० साली स्व. बाळासाहेबांनी स्थापन केली. बाळासाहेबांचे मालवणवर विशेष प्रेम होते. त्यामुळेच बाळासाहेब मालवण वासियांसमोर नतमस्तक झाले होते. आजही जुने शिवसैनिक हे शिवसेनेसोबत आहेत. ते कुठेही गेलेले नाहीत, असे ते म्हणाले. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले, भाई गोवेकर यांच्यासारख्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला ऊर्जा मिळत आहे. आणि या ऊर्जेच्या माध्यमातून संघटना वाढीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पश्चात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन शिवसैनिकांना केलं होते. आज तेच काम आपण सर्वजण करीत आहोत. आपल्यातील गद्दार आणि भाजपा सारख्या बेईमानांना आपण जोपर्यंत गाडत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसू नका. २००५ ला नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा जोपर्यत बाळासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू आणणाऱ्या राणेना आपण पाडत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा चंग आपण सर्वांनी घेतला होता. तसाच ज्या गद्दारांनी आपल्याला धोका दिला आणि ज्या भाजपने बेईमानी केली, त्यांना गाडल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार सर्वांनी करूया, असे आवाहन हरी खोबरेकर यांनी केले. यावेळी महेश कांदळगावकर, पूनम चव्हाण, शिल्पा खोत, मंदार ओरसकर यांनीही विचार मांडले.