मालवण शहरातील “त्या” कामाला तात्काळ सुरुवात करा ; माजी खा. निलेश राणेंची पालिकेला लेखी सूचना
भाजपाचे युवा नेतृत्व सौरभ ताम्हणकर यांनी वेधले होते निलेश राणेंचे लक्ष
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण बाजारपेठ दलितवस्ती चर्मकार वसाहत येथील रस्त्याच्या रखडलेल्या गटाराचे बांधकाम तातडीने सुरु करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात यावेत, अशी लेखी सूचना भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना केली आहे. या प्रश्नाकडे भाजपचे मालवण शहरातील युवा नेतृत्व सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांनी निलेश राणेंचे लक्ष वेधले होते. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना देखील माहिती देण्यात आली आहे.
मालवण बाजारपेठ दलित वस्ती चर्मकार वसाहत येथील रस्त्याच्या या गटारासाठी नगरपरिषदेकडून २८ लक्ष एवढ्या निधीची तरतूद करून निविदा प्रक्रिया करण्यात आली. फेब्रुवारी २०२२ मध्ये कार्यारंभ आदेश देऊनही अद्याप हे काम सुरू झालेले नाही. चर्मकार वसाहतीची मागणी आणि त्याची समस्या पहाता हे काम तातडीने पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र सदर कामासाठी नियुक्त केलेला ठेकेदार हा वेळकाढूपणाच्या धोरणाचा अवलंब करत आहे. आज निधीची उपलब्धता असूनही केवळ ठेकेदारामुळेच या कामाला विलंब होत आहे. याचा त्रास चर्मकार वसाहतीला सहन करावा लागत आहे. तरी सदरील विषयाचा आपण गांभीर्याने विचार करून मालवण दलितवस्ती चर्मकार वसाहत येथील रस्ता गटाराचे बांधकाम त्वरित सुरू करण्याचे संबंधित ठेकेदाराला आदेश द्यावेत आणि हे काम योग्य तो दर्जा राखून वेळेत पूर्ण व्हावे याची दक्षता घ्यावी, असे निलेश राणे यांनी या लेखी पत्रात म्हटले आहे.